सेतूचे दाखले महा-ई-सेवा केंद्राला
By admin | Published: June 23, 2016 11:28 PM2016-06-23T23:28:01+5:302016-06-24T00:55:13+5:30
दाखल्यांचा निपटारा : प्रशासनाचा निर्णय
नाशिक : सेतू केंद्रात दाखल्यांसाठी दररोज सादर होणारे अर्ज व तयार होणारे दाखल्यांचा ताळामेळ बसत नसल्याने परिणामी विद्यार्थी, पालकांची होणारी हेळसांड लक्षात घेता, सेतू केंद्रात दाखल झालेले अर्ज महा-ई-सेवा केंद्राकडे सुपूर्द करून त्यांच्याकरवी दाखले तयार करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सुमारे दोन हजार दाखले तयार होऊन त्याचे वितरण करणे सोपे जाणार आहे.
जिल्हा सेतू कार्यालयात दररोज शेकडोच्या संख्येने दाखल्यांसाठी अर्ज सादर होत असनू, महाआॅनलाइनच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक त्रुटींमुळे ज्या प्रमाणात दररोज दाखले तयार होणे गरजेचे आहे, तितके होत नाहीत. सुमारे तीन हजारांहून अधिक दाखले तयार होणे अद्याप बाकी असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. प्रशासन उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी त्यावर तोडगा शोधून सेतू केंद्रात नागरिकांनी दाखल केलेले अर्ज ४० महा-ई-सेवा केंद्रचालकांना सोपवून त्यांच्याकडून दाखले तयार करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक दिवसाची मुदत दिली जाणार असून, दाखले तयार झाल्यावर सर्व प्राधिकृत अधिकाऱ्यांना एकत्र बसवून त्यावर स्वाक्षऱ्या घेण्यात येणार आहे. दाखल्यांवर स्वाक्षरी झाल्यानंतर सेतू केंद्रामार्फतच वितरण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)