प्रभाग २८ मध्ये चार जागांवर सेनेचे आठ उमेदवार
By Admin | Published: February 4, 2017 01:26 AM2017-02-04T01:26:58+5:302017-02-04T01:27:10+5:30
शिवसेनेचा प्रताप : दोन्ही गटांना वाटले एबी फॉर्म
नरेंद्र दंडगव्हाळ सिडको
महापालिका निवडणुकीत शिवसेनेत उमेदवारी वाटपातच मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळून आली असून, सिडकोतील एकाच प्रभागात चार जागांसाठी चक्क आठ उमेदवारांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देण्याचा प्रताप शिवसेनेने केला आहे. मात्र, दोन्ही गटांकडून समोरच्यांकडील उमेदवारांच्या एबी फॉर्मकडे संशयाने पाहिले जाऊ लागले असून, आपण सादर केलेला एबी फॉर्मच अधिकृत असल्याचा दावा केला आहे.
महापालिका निवडणुकीत १२२ जागांसाठी ८५० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेकडे मुलाखती दिल्याने त्याच वेळी प्रत्यक्ष उमेदवारी वाटपात अघटित घडण्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अवधी संपला तरी सेनेने अधिकृत उमेदवारांची यादी घोषित न केल्याने संभ्रम व संशयाला पुष्टी मिळाली. उमेदवारी देताना एबी फॉर्म वाटपात मोठ्या प्रमाणावर घोळ झाला. त्यातून सिडको विभागात सेनेचा वेगळाच प्रताप समोर आला आहे. एकाच प्रभागात चार जागांसाठी चक्क आठ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. प्रभाग २८ मध्ये सेनेचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, मनसेतून सेनेत प्रवेश केलेल्या सुवर्णा मटाले व शीतल भामरे या एका गटाने स्वतंत्रपणे येऊन सेनेच्या अधिकृत एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर याच प्रभागात स्वीकृत नगरसेवक माणिक सोनवणे, रेणुका गायधनी व सोनाली काकडे यांनीही एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात माणिक सोनवणे यांच्यासोबत गटाने सर्वात अगोदर एबी फॉर्मसह अर्ज दाखल केल्याचे समजते. प्रभाग २९ मध्ये मनसेतून सेनेत प्रवेश केलेल्या रत्नमाला राणे, माजी नगरसेवक सुमन सोनवणे, सतीश खैरनार व मनसेतून सेनेत गेलेले नगरसेवक अरविंद शेळके या एका गटाने एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला, तर याच प्रभागातून सेनेकडून अधिकृत एबी फॉर्मसह विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र दीपक बडगुजर, भूषण देवरे, माधुरी खैरनार व सुमन सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या प्रभागात चार जागांसाठी आठ उमेदवारांनी सेनेकडून अधिकृत एबी फॉर्म जमा केले आहेत. त्यात बडगुजर गटाने सर्वांत आधी एबी फॉर्म दिल्याचे सांगितले जाते. आता नेमका कोणत्या गटाचा एबी फॉर्म खरा याची पडताळणी निवडणूक अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. या प्रकाराने सेनेतील गटबाजी उफाळून आली असून, त्याचे पडसाद प्रत्यक्ष निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.