सत्ताधाºयांकडून सात संचालकांचे पत्ते साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:09 AM2017-08-04T01:09:21+5:302017-08-04T01:11:01+5:30
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.३) उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मातब्बरांचे पत्ते कापले गेले. सत्ताधारी प्रगती पॅनलकडून विद्यमान सात संचालकांना, तर समाज विकास पॅनलकडून तीन संचालकांना पुन्हा संधी दिली गेली आहे.
नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत गुरुवारी (दि.३) उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी मातब्बरांचे पत्ते कापले गेले. सत्ताधारी प्रगती पॅनलकडून विद्यमान सात संचालकांना, तर समाज विकास पॅनलकडून तीन संचालकांना पुन्हा संधी दिली गेली आहे. यातही डॉ. तुषार शेवाळे यांना मालेगाव संचालक पदावरून थेट अध्यक्ष पदाची उमेदवारी सत्ताधारी पॅनलने जाहीर केली, तर निफाड संचालक प्रतिनिधी पदावरून विरोधी समाज विकास पॅनलने दिलीपराव मोरे यांना सभापतिपदाची उमेदवारी देत बढती दिली.
दरम्यान, दोन्ही पॅनलकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. सत्ताधारी पॅनलने पाच डॉक्टरांना, एक वकील व एक अभियंत्याला संधी दिली आहे, तर विरोधी पॅनलने दोन डॉक्टार, दोन वकिलांना उमेदवारीची संधी देत सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधारी प्रगती पॅनलकडून स्वत: नीलिमा पवार यांच्यासह डॉ. तुषार शेवाळे, डॉ. विश्राम निकम, डॉ.सुनील ढिकले, नाना महाले, दिलीप पाटील, भाऊसाहेब खातळे या सात विद्यमान संचालकांना यंदाच्या निवडणुकीत संधी मिळाली आहे, तर रवींद्र देवरे, शिरीषकुमार कोतवाल, अंबादास बनकर, नानाजी दळवी, मुरलीधर पाटील, भरत कापडणीस या सहा संचालकांचे पत्ते कापण्यात आले आहे. श्रीराम शेटे या विद्यमान संचालकांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याने त्यांच्या जागी दत्तात्रय पाटील यांना संधी देण्यात आली आहे. समाज विकास पॅनलनेही अध्यक्षपदी पुन्हा प्रताप सोनवणे यांना संधी देतानाचदिलीपराव मोरे यांना सभापती पदाची उमेदवारी देत बढती दिली आहे. सभापती अॅड. नितीन ठाकरे यांनी थेट सरचिटणीसपदी उमेदवारी करीत नीलिमा पवार यांना आव्हान दिले आहे.