सात विद्यार्थिनींची प्रकृ ती खालावली
By admin | Published: September 29, 2015 11:54 PM2015-09-29T23:54:07+5:302015-09-29T23:55:03+5:30
विषबाधा प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
दिंडोरी : येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३१ मुलीना उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने सोमवारी (दि. २८) त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, मंगळवारी (दि. २९) आणखी पंधरा मुलींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सात विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना अत्यवस्थ स्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही विषबाधा कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
विद्यार्थिनी गंभीर स्थितीत असतानाही रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अधिकारी वेळेवर हजर होऊ शकले नसल्याने रुग्णालयातील एकंदर ढिसाळ कारभाराचा प्रत्यय यावेळी आला. विशेष म्हणजे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पालक, पत्रकार व कार्यकर्ते यांच्या भेटीने मुलींची प्रकृती मानसिक दबाव येत असल्याने बिघडत असल्याचा जावईशोध लावला. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी (दि. २९) पंधरा मुलीना उलट्या, जुलाब, थंडी- तापाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात ललिता जाधव, हर्षदा झिरवाळ, प्रियंका झणकर, सुरेखा गायकवाड, लता गांगोडे, शैला डगळे, सुमित्रा राऊत, सविता खोटरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या मुलींची प्रकृती गंभीर होत असताना केवळ परिचारिका वानखेडे या एकमेव उपचार करीत होत्या. वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क करून बोलावून घ्यावे लागले, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे फिरते पथक वरच्या वरच फिरकून गेले. प्रत्यक्ष वैद्यकीय अधीक्षक सूर्यवंशी यांनी फिरत्या पथकाला तिथेच थांबण्याचे आदेश देऊनही पथकाने ते जुमानले नाही. यावरून रुग्णालयावर कोणाचाही वचक नसल्याचा प्रत्यय आमदार नरहरी झिरवाळ यांनाही आला. झिरवाळ यांनी रुग्णालयाला भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावूनही त्यांनी रुग्णालयात येणे टाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली
आहे.
सद्यस्थितीत मालती पवार, कलावती गायकवाड, रेखा तुंगार, ललिता गायकवाड, तारा महाले, छाया गावंडे, कांचन राऊत या उपचार घेत आहे. परिस्थितीची दाखल घेत अप्पर आयुक्त अशोक लोखंडे, प्रकल्प अधिकारी गोलायीत, अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, रासकर यांनी वसतीगृहातील विद्यार्थिनीची चौकशी करून या विद्याथीनींना अन्नातून विषबाधा झाली कि अन्य काही कारनास्तव उलट्या व जुलाबाचा त्रास झाला हे प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल असे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात विषबाधेचा स्पष्ट उलगडा होत नसल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधान आले असून, सर्व शासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तर वसतीगृहातील मुलीच्या विषबाधेच्या प्रकारामुळे दिंडोरीतील वस्तीगृहातील मुलांमध्यही घबराटीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)