म्हेळूस्केत बिबट्याने केल्या सात शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 06:12 PM2020-12-28T18:12:44+5:302020-12-28T18:13:16+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथील बनकर वस्तीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भागात वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.
म्हेळूस्के येथील शेतकरी प्रकाश बनकर यांच्या शेतावर मोलमजुरी करण्यासाठी दत्तू गायकवाड हे आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्याला आहेत. आर्थिक आधार होण्याच्या उद्देशाने ते मोलमजूरीसह शेळीपालनही करीत होते.परंतु,काल (दि.२७)मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला केल्याने सहा शेळ्या जागीच ठार झाल्या तर एक शेळी बिबट्याने अंधाराचा फायदा घेत अडचणीत नेऊन फस्त केली. त्यामुळे जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याने गायकवाड हतबल झाले असून मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर संकट ओढावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.