सात ग्रुप अॅडमिन अटकेत
By admin | Published: October 15, 2016 03:07 AM2016-10-15T03:07:07+5:302016-10-15T03:09:49+5:30
व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट : १४१ दंगलखोर जेरबंद
नाशिक : तळेगाव अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यातील काही भागांत तणाव निर्माण झाला होता़ अफवा पसरविण्याचे काम सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे समोर आले आहे़ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सोशल मीडिया व्हॉट््सअॅपच्या सात ग्रुप अॅडमिनवर सायबर अॅक्टन्वये गुन्हे दाखल करून अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली़
सिंघल यांनी सांगितले की, दंगलकाळात मोठ्या संख्येने सोशल मीडियाद्वारे चिथावणी देण्यात आली़ पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या ग्रुप अॅडमिनमध्ये अंबडमधील (४), सातपूर (१), गंगापूररोड (३), तर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरातील एकाचा समावेश आहे़ समाजात तेढ निर्माण करणारे, दंगल भडकविण्यास कारणीभूत ठरणारे संदेश, व्हिडीओ पाठविणाऱ्या या गु्रप अॅडमिनवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे़ सायबर लॅबमार्फत सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात आला होता़
सोशल मीडिया व्हॉट््सअॅप, फेसबुकवर ग्रुप अॅडमिनने तळेगाव फाट्यावरील रास्ता रोको, पालकमंत्र्यांसोबत आक्षेपार्ह वक्तव्य, फोटो, पोलिसांवर दगडफेक केल्याचे फोटो व व्हिडीओ तसेच चिथावणीखोर संदेश पाठविले होते. यामुळे शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जाळपोळ, दगडफेकीसारख्या घटनांना हवा मिळाली़ (प्रतिनिधी)