नाशिकमध्ये सात तास थरार; बघ्यांच्या गर्दीने बिथरलेल्या बिबट्याने वृद्धाला मारला पंजा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:19 PM2022-01-31T18:19:47+5:302022-01-31T18:21:21+5:30

‘बिबट्या आला... बिबट्या आला....’ असा कल्लोळ सुरू झाला अन् बघ्यांची गर्दी उसळली.

seven hours of tremors in nashik leopard scattered by the crowd of spectators slapped the old man | नाशिकमध्ये सात तास थरार; बघ्यांच्या गर्दीने बिथरलेल्या बिबट्याने वृद्धाला मारला पंजा

नाशिकमध्ये सात तास थरार; बघ्यांच्या गर्दीने बिथरलेल्या बिबट्याने वृद्धाला मारला पंजा

Next

नाशिक : येथील नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर भागातील जय भवानी रोड परिसरात सोमवारी (दि. ३१) सकाळी बिबट्याने नागरिकांना दर्शन दिल्याने एकच धावपळ उडाली. ‘बिबट्या आला... बिबट्या आला....’ असा कल्लोळ सुरू झाला अन् बिबट्याला बघण्यासाठी स्लम भागातील बघ्यांची गर्दी उसळली. यावेळी बिबट्याने एका वृद्धाला पंजा मारून जखमी केले. सुमारे सात तास वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने शर्थीचे प्रयत्न करीत अखेर बिबट्याला पिंजराबंद केले.

जय भवानी रोडवरील सद्गुरूनगर, डावखरवाडी, फर्नांडिसवाडी, लवटे मळा या भागात बिबट्याने या गल्लीतून त्या गल्लीत झेप घेत धुमाकूळ घातला. सकाळी साडेसात वाजता पश्चिम नाशिक वन विभागाच्या पथकाला या भागात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिराव यांचे रेस्क्यू पथक लवाजम्यासह घटनास्थळी पाेहोचले. प्रारंभी बिबट्या नेमका कुठे दडून बसलाय, याचा शोध वन विभागाचे कर्मचारी व मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले, वन्यजीवप्रेमी अभिजित महाले आदींनी सुरू केला. यावेळी परिसरातील रहिवाशांकडून माहिती जाणून घेतली. 

तसेच बिबट्याच्या पाऊलखुणांवरूनही त्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, सद्गुरूनगरमधील एका बंगल्यातून जोरात ओरडण्याचा आवाज आला. पथकाने त्या दिशेने धाव घेतली असता, तेथे एक वृद्ध जखमी झाल्याचे त्यांना आढळले. तत्काळ जखमी सुधीर क्षत्रीय यांना येथील बिटको रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. बिबट्याच्या या हल्ल्यानंतर वन विभाग, उपनगर पोलिसांवर दबाव अधिकच वाढला. रेस्क्यू ऑपरेशनला गती देण्यात आली. यावेळी एका बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या मोटारीखालून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आल्याचे रहिवाशांनी सांगितले. पथकाने खात्री पटविली आणि संपूर्ण मोटार व त्याभोवतालचा बंगल्याचा आवार जाळीने झाकून घेतला. यावेळी वनरक्षक दीपक जगताप यांनी बिबट्याच्या दिशेने नेम धरत ‘ब्लो-पाईप’मधून भुलीचे औषध असलेले इंजेक्शन सोडले. त्यानंतर काही वेळातच बिबट्या बेशुद्ध झाला अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
 

Web Title: seven hours of tremors in nashik leopard scattered by the crowd of spectators slapped the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.