सात लाख विद्यार्थ्यांनी लिहिले पालकांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:56 AM2019-10-20T01:56:40+5:302019-10-20T01:56:58+5:30
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा’, असा उपक्रम जिल्ह्यातील शाळांमधून राबविण्यात आला होता.
नाशिक : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा’, असा उपक्रम जिल्ह्यातील शाळांमधून राबविण्यात आला होता.
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेच्या माध्यमातून ‘व्होट कर नाशिककर’ अशी मोहीम राबविताना अनेकविध उपक्रम राबविण्यात आले. पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवितात किंबहूना मुलांच्या इच्छेला प्रतिसाद देतील आणि पालक मतदान केंद्रांवर जातील त्यातून मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल या अपेक्षेने सदर उपक्रम जिल्हा निवडणूक शाखेने राबविला. या उपक्रमासाठी शिक्षण विभागाने राबविलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा या मोहिमेत मोठा सहभाग राहिला. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पेतून पालकांना मतदानासाठी साद घातली आहे. जिल्ह्यातील ७ लाख २ हजार ७५५ विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना अशाप्रकारचे पत्र लिहिले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने पालकांना पत्रे दिली आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली सुमारे ५० ते ६० पत्रे अतिशय आशयपूर्ण आणि औचित्याला अनुरूप, अशी लिहिली असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीतून अनेक उपाययोजनादेखील यातून समोर आली आहे. या पत्रांचा शिक्षण विभागाकडून संग्रह केला जाणार आहे. ‘व्होट कर नाशिककर’ या मोहिमेच्या माध्यमातून ५२ वर्षांतील सर्वाधिक मतदानाचा विक्र म नुकताच नोंदविला गेला आहे.
टपाल यंत्रणेवरील
ताण वाचला
सदर मोहीम सुरू करताना प्रारंभी शाळेतून विद्यार्थ्यांनी लिहिलेले पत्र हे टपालाच्या माध्यमातून पालकांना धाडण्याची योजना आखण्यात आलेली होती. परंतु विद्यार्थ्यांकडून मिळालेला एकूणच प्रतिसाद पाहता टपाल यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी स्वहस्तेच पालकांना पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी पालकांकडे पत्रे सुपुर्द केली. या उपक्रमासाठी शाळांचा उत्स्फूर्त सहभागही महत्त्वाचा राहिला.