दोन हजार रुपयांसाठी वीस लाखांच्या मिळकतीची जप्ती सातपूर विभागातील प्रकार : ऐन मार्च महिन्यात झाले जागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:10 AM2018-03-02T02:10:00+5:302018-03-02T02:10:00+5:30
नाशिक : महापालिकेची थकबाकी वसूल करणे योग्यच असले तरी त्यासाठी प्रचलित पद्धत मात्र अत्यंत जाचक आहे. एखाद्या मिळकतीची एक ते दोन हजार रुपयांची रक्कम थकली आहे.
नाशिक : महापालिकेची थकबाकी वसूल करणे योग्यच असले तरी त्यासाठी प्रचलित पद्धत मात्र अत्यंत जाचक आहे. एखाद्या मिळकतीची एक ते दोन हजार रुपयांची रक्कम थकली म्हणून थेट लाखो कोट्यवधी रुपयांच्या मिळकती जप्त करण्याच्या नोटिसा सातपूर परिसरात दिल्या जात असून, तो चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, वर्षभर याबाबत कोणतीही नोटीस न बजावणारे कर्मचारी आता मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावावर हा प्रकार खपवीत आहेत. महापालिकेच्या वतीने घरपट्टी वसुलीसाठी सध्या धडक मोहीम सुरू आहे. वर्षातून एकदा नोटीस बजावल्यानंतर आता वसुलीच्या कारवाईसाठी कर्मचारी सरसावले आहेत. सातपूर विभागीय कार्यालयामार्फत घरपट्टी वसुली विभागाकडून थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या. या नोटिसांमध्ये घरपट्टीची रक्कम जमा करा अन्यथा मिळकत जप्तीची कारवाई केली जाईल, असे नमूद केले आहे. वास्तविक थेट मिळकत जप्त करण्याच्या आधी कोणत्याही प्रकारची डिमांड नोटीस किंवा दरवर्षी बजावले जाते अशाप्रकारचे सूचना पत्रही बजावण्यात आलेले नाही. काही भागात तर पाणी पट्टीची देयके वेळेत मिळालेल्या नाही अशा स्थितीता थेट मिळकत जप्तीच्या कारवाईचीच नोटीस बजावली गेल्याने पैशांची जुळवाजूळव करताना नागरिकांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे, एक दोन हजार रुपये काही ठिकाणी दहा ते वीस हजार रुपयांची रक्कम थकली असेल तरीही लाखो- कोट्यवधी रुपयांची मिळकत जप्त करण्याचा अजब प्रकारदेखील यानिमित्ताने चर्चेचा विषय ठरला आहे. सातपूर हा कामगार वस्तीचा भाग असून अनेक ठिकाणी कामगारांना मंदीला सामोरे जावे लागले आहे.