नाशिक विभागात आढळले सात बिबटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:37 AM2018-05-04T00:37:19+5:302018-05-04T00:37:19+5:30
नाशिक : नाशिक विभागातील चार वन्यजीव अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या चोवीस तासांच्या वन्यजीव प्रगणनेत १३९७ वन्यजीव आढळले .
नाशिक : नाशिक विभागातील चार वन्यजीव अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या चोवीस तासांच्या वन्यजीव प्रगणनेत १३९७ वन्यजीव आढळले असून, त्यात अवघे सात बिबटे आढळले आहेत. वन्य प्राण्यांच्या संख्येचा अंदाज मिळावा यासाठी राज्यात प्रत्येक वन्यजीव संरक्षित क्षेत्रनिहाय व वन विभागनिहाय दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्रगणना करण्यात येते. अभयारण्यातील पाणवठ्याजवळ वन्यप्राणी प्रगणना करण्यात येते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली पाणस्थळावरील वन्य प्राणी गणना यंदा राज्यातील व्याघ्र प्रकल्प, राष्टÑीय उद्यान, अभयारण्य, संवर्धन राखीव व इतर वनक्षेत्रात राबविण्यात आली. नाशिक विभागात भंडारदरा, राजूर, नांदूरमध्यमेश्वर, अनेर डॅम, पाल, जमन्या याठिकाणी प्रगणना करण्यात आली. एकूण ५१ ठिकाणी झालेल्या गणनेत १३९७ वन्यजीव आढळले. यामध्ये सात बिबटे आढळले आहेत. लांडगे ११, कोल्हे ६३, तरस २२, अस्वल ३, खोकड ३, मुंगस २८, सांबर ९७, भेकर ५०, नीलगाय १५, माकड २५३, ससा ६४, रानडुक्कर १५५, रानमांजर ४६ व इतर ५९० प्राण्यांचा समावेश आहे. प्रगणनेत १०३ वनकर्मचारी तसेच ५७ अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी व निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला.