सात वर्षांनंतर निवडणूक जाहीर कादवा साखर कारखाना, प्रारूप मतदार यादीच्या कामाला प्रारंभ
By admin | Published: January 21, 2015 02:04 AM2015-01-21T02:04:51+5:302015-01-21T02:05:22+5:30
सात वर्षांनंतर निवडणूक जाहीर कादवा साखर कारखाना, प्रारूप मतदार यादीच्या कामाला प्रारंभ
नाशिक : जिल्'ात सहकारी तत्त्वावर आजमितीस एकमेव सुरू असलेल्या मातेरेवाडी (दिंडोरी) येथील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली असून, १७ जानेवारीस मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. येत्या २१ फेब्रुवारी २१०५ रोजी कादवाच्या मतदारांची अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात १६ जानेवारी रोजीच जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर मिलिंदसेन भालेराव यांच्या आदेशान्वये हा मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच २१ फेब्रुवारीनंतर कादवा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा निवडणूक सहकारी अधिकारी मिलिंदसेन भालेराव यांनी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमानुसार १७ जानेवारी २०१५ रोजी मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध तयार करणे, १७ जानेवारी ते २७ जानेवारी २०१५ नुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती / आक्षेप दाखल करण्याची मुदत, ६ फेब्रुवारी २०१५ रोजी दाखल हरकती / आक्षेप यांच्यावर निर्णय देणे, २१ फेब्रुवारी २०१५ रोजी अंतिम प्रारूप मतदार यादी कादवा कारखाना, तहसीलदार दिंडोरी व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)