शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्षांची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 01:48 AM2022-04-20T01:48:09+5:302022-04-20T01:50:08+5:30
शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाटेत अडवून तिला ठार मारण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरले. पेठ तालुक्यातील करंजाळीजवळील रहिवासी असलेल्या भरत शांताराम किलबिले (२२) याला न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
नाशिक : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाटेत अडवून तिला ठार मारण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरले. पेठ तालुक्यातील करंजाळीजवळील रहिवासी असलेल्या भरत शांताराम किलबिले (२२) याला न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताने २०१८ साली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. पीडित मुलगी सकाळी शाळेत जात असताना आरोपी भरत किलबिलेने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करीत त्याने पीडितेस धमकी दिली. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात भरतविरोधात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक डी. पी. भागवत यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासले. आरोपी भरतविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी त्यास दोेषी धरले. भरत यास सात वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.