सत्तर वर्षांच्या आजींची उबदार किमया
By admin | Published: August 29, 2016 01:00 AM2016-08-29T01:00:03+5:302016-08-29T01:16:36+5:30
सुयांची जादू : विणकामाद्वारे विकसित केले विविध प्रकार
भाग्यश्री मुळे नाशिक
आनंदवली येथे राहणाऱ्या सत्तर वर्षांच्या आजींनी विणकाम कलेत वाखाणण्याजोगी कामगिरी केली असून, एवढ्या वयातही त्या तितक्याच उत्साहाने उबदार लोकर आणि सुई हाताळत एकाहून एक सरस कलाकृती घडवत आहेत. सिलिंडर कॅप, पांचोला आधुनिक गळ्याची जोड, मानेचा पट्टा, काश्मिरी कॅप, लेडिज वुलन टॉप त्यांनी स्वत:ची कल्पकता वापरत विकसित केले आहेत. लोकरी कपड्यांमध्ये कुठला नवा प्रकार, नवीन डिझाइन दिसताच त्या ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात.
उषा भोसले असे त्यांचे नाव असून नुकत्याच त्या शिक्षकीपेशातून निवृत्त झाल्या आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी विणकामाच्या सुया हाती घेतल्या आहेत आणि आज वयाच्या सत्तरीतही त्या त्यांच्या हाती तितक्याच उत्साहाने आणि जोमाने चालत आहेत. या सुयांच्या माध्यमातून त्यांनी आजवर हजारो प्रकार तर तयार केलेच पण ८०० ते ९०० महिला, मुलींनाही घडविले आहे. यातील अनेकींना विणकामातून रोजगाराचा मार्ग मिळाला तर अनेकींना आपल्या प्रियजनांसाठी हवे तसे उबदार कपडे विणण्याची संधी मिळाली आहे. उषाताई मूळच्या धुळे जिल्ह्यातील बेटावदच्या. त्यांच्या आई शिक्षिका होत्या. उषाताई गिरणारे, गंगापूर येथील शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम करताना शिवणकाम, विणकाम विषयातही आवडीने रस घेत.१९८१ साली त्या आनंदवलीच्या शाळेत आल्या. येथेही त्यांनी अनेक मुलींना विणकामाचे धडे दिले. २००२ साली त्या सेवानिवृत्त झाल्या. तेव्हापासून त्या विणकामाला भरपूर वेळ देत आहेत. उषातार्इंच्या घरी लोकरीच्या अगणित प्रकारांनी एक खोलीच भरलेली आहे. त्यात पायमोजे, बेबी सेट, आबालवृद्धांचे स्वेटर, शाल, जॅकेट, पांचो, कॅप, तोरण, पशुपक्षी, रुमाल, चादर, आसने, पिशव्या, कुशन कव्हर, टॉप अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. मानेचा पट्टा हा प्रकारही त्यांनी कल्पकतेने विकसित केला असून, हा पट्टा थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांना किंवा मानदुखीचा त्रास असणाऱ्यांना वरदान ठरतो आहे. ज्यांना पायांचा त्रास आहे, बोटे वाकडी आहेत, अपुरी आहेत आणि सर्वसामान्य लोकांप्रमाणे चप्पल घालता येत नाही अशांसाठी चप्पल सोल असणारे वुलन सॉक्स विकसित केले आहेत. विविध नंबरच्या मोठ्या सुया, क्रोशाची सुई आणि मशीनवर विणकाम या तिन्ही प्रकारांमध्ये उषातार्इंनी विणकाम आत्मसात केले असून, आपल्याकडील कलेचा हा वसा त्यांनी त्यांच्या विद्यार्थिनींबरोबरच मुलगी, सुना, नाती यांच्यापर्यंत प्रवाहित ठेवला आहे. उत्साह आणि चिकाटी घेऊन काम करणाऱ्या उषा भोसले समाजापुढे एक आदर्श म्हणून कार्यरत आहे.