सातवा वेतन आयोग लागू होणार
By admin | Published: July 9, 2017 12:17 AM2017-07-09T00:17:30+5:302017-07-09T00:17:55+5:30
नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे प्रतिपादन बलराज मगर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून कोणतीही कपात न करता सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियनचे राज्य अध्यक्ष बलराज मगर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषद कर्मचारी व सहकारी परिषद बॅँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी (दि.८) सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बलराज मगर बोलत होते. यावेळी बलराज मगर यांच्या हस्ते बॅँकेत निवडून आलेले संचालक विजयकुमार हळदे, भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार, अजित आव्हाड, अशोक गोळेचा, शिरीष भालेराव, विजयराजे मोरे, मंदाकिनी पवार, धनश्री कापडणीस, प्रशांत कवडे, दिलीप थेटे, दिलीपराव सलादे, प्रशांत गोवर्धने, सुनील बच्छाव, राजेंद्र बैरागी आदींसह सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, बॅँकेचे माजी संचालक ज्येष्ठ नेते महेशराव आव्हाड, रमेश राख, दिलीप वारे, दिलीप वैद्य, पांडुरंग वाजे, पंडित कट्यारे, मधुकर आढाव आदी उपस्थित होते.