चांदवड तालुक्यात सत्तर टक्के खरीप पिकांची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:14 AM2021-07-27T04:14:37+5:302021-07-27T04:14:37+5:30
चांदवड (महेश गुजराथी) : तालुक्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ४९८९२ हेक्टर इतके असून त्यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, भुईमूग, बाजरी, मूग, ...
चांदवड (महेश गुजराथी) : तालुक्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ४९८९२ हेक्टर इतके असून त्यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, भुईमूग, बाजरी, मूग, उडीद, तूर या पिकांचा समावेश होतो. मका पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र १०,७३३ हेक्टर इतके असून १७२७७.५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सोयाबीन पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र ५२८९ हेक्टर इतके असून ८०६७.६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. म्हणजेच सोयाबीनच्या सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा साधारणत: दीडपट वाढ झालेली आहे. बाजरी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ९२३८ हेक्टर इतके असून ३३६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. म्हणजेच बाजरी पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट झालेली आहे. शेतकरी बाजरी व मका या पिकांकडून सोयाबीन या पिकाकडे वळलेला दिसून येत आहे. तालुक्यात सरासरी ७० टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. चालू वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत कांदा लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने पूर्व भागात मूग, भुईमूग, सोयाबीन, मका, बाजरी व काही प्रमाणात तूर या पिकांची पेरणी करण्यात आली होती. पश्चिम पट्ट्यामध्ये थोड्या फार प्रमाणात पेरणी करण्यात आली होती. १५ जूननंतर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. परंतु गेल्या पाच-सहा दिवसांपासून होणाऱ्या संततधारेमुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये ८० टक्केपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
---------------------
सद्यस्थितीमध्ये मूग, सोयाबीन, भुईमूग, मका,बाजरी आदी पिके वाढीच्या अवस्थेत असून पीक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. कांदा पुनर्लागवडीसाठी पुढील महिन्यात रोपे तयार होणार आहेत. अजूनही काही ठिकाणी कांद्याचे बी टाकण्याचे काम चालू आहे.
कृषी विभागामार्फत एप्रिल व मे महिन्यांमध्ये सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक गावागावात जाऊन दाखविण्यात आले व घरचे बियाणे वापराबाबत जनजागृती करण्यात आली होती. त्याचे फलित म्हणजे तालुक्यातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात दीड पटीने वाढ झालेली आहे.
---------------
अन्न सुरक्षा अभियान
तालुक्यात कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे राबवून गावागावात जैविक बीजप्रक्रिया, बीबीएफद्वारे पेरणी, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खतांचा संतुलित वापर, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, तालुक्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोग नियंत्रण याबाबत कृषी विभागामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. क्राॅपसॅप अंतर्गत मका व सोयाबीन या पिकांच्या शेतीशाळा घेण्यात येत असून तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मूग, बाजरी, सोयाबीन व मका पिकांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेची अंमलबजावणी करण्याची तयारी चालू आहे.
26 एम.एम.जी.2
260721\26nsk_4_26072021_13.jpg
२६ एमएमजी २