आॅटोमोटिव्हच्या लेलॅँड विभागाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:57 AM2018-12-05T00:57:23+5:302018-12-05T09:07:24+5:30
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील पोस्टऑफिससमोरील आॅटोमोटिव्ह मॅन्यू.च्या लेलॅँड विभागाला मंगळवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखो रूपयांची वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, आगीचे निश्चित कारण रात्री उशिरापर्यंत कळु शकले नव्हते.
अंबड पोस्टऑफिससमोरील आॅटोमोटिव्ह मॅन्यू.च्या लेलॅँड विभागाला मंगळवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र स्वरूप धारण केल्याने आगीच्या ज्वालांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. शोरूममध्ये दुरूस्तीसाठी आलेली वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शोरूममध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेची माहिती तातडीने अग्नीशमन विभागाला देण्यात आली. काही वेळेतच दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री १.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.
सुमारे 3 कोटींचे नुकसान
मध्यरात्री लागलेल्या या आगीत लेलॅँड विभागातील 8 टक्के स्पेअरपार्टस् जळून खाक झाले असून कंपनीतील एक बस व दोन मिनी ट्रॅक्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 3 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
-सुदीप अनावकर, कन्सल्टंट, ऑटोमोटिव्ह मॅन्यूफॅकचरर्स प्रा. लि.