शालिमार येथे साडी दुकानाला भीषण आग
By Admin | Published: April 13, 2017 12:54 AM2017-04-13T00:54:08+5:302017-04-13T00:56:17+5:30
दुकान खाक कोट्यवधी रुपयांचे नुकसान
नाशिक : शालिमार येथील दुमजली मानसी साडी सेंटरला बुधवारी (दि़ १२) मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीत दुकानातील साड्या व कपडे खाक झाले असून, सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे़ दरम्यान, शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शालिमार येथील मानसी साडी सेंटरमधून धूर येत असल्याचे सोमनाथ सोनवणे यांनी बघितले व त्यांनी तत्काळ ही घटना अग्निशमन दलास कळविली़ या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले; मात्र या दुकानाच्या मोठ्या शटरमुळे आग विझविण्यासाठी पाणी मारणे अवघड झाले होते़
मानसी साडी सेंटरच्या दुकानमालकांना आगीची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शटरचे कुलूप उघडून दुकान खुले केले़; मात्र तोपर्यंत दुकानातील फर्निचर व कपडे आगीने वेढले गेले होते़ या आगीमुळे दुकानाचा वरचा मजला संपूर्ण खाक झाला. अग्निशमन दलातील जवान श्याम राऊत, राजेंद्र नाकील, विजय नागपुरे, हेमंत बेळगावकर, नानासाहेब गांगुर्डे, इसाक शेख, अशोक सरोदे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले़ शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (प्रतिनिधी)