काम देण्याच्या बहाण्याने मूकबधीर युवकावर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:17 PM2019-11-27T13:17:17+5:302019-11-27T13:19:00+5:30
मूकबधीर युवकाचे अपहरण करून संशयितांनी त्याच्यावर शारिरिक-मानसिक अत्त्याचार केल्याने त्या युवकाची प्रकृती खालावली आहे.
नाशिक : ‘तुला काम देतो...’ असे सांगून दोघा अज्ञात इसमांनी सिडको येथील एका कॉलनीमधून मूकबधीर युवकाला जबरदस्तीने एॅक्टिवा दुचाकीवर बसवून थेट भद्रकाली परिसरातील एका लॉजमध्ये आणून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्त्याचारानंतर युवकाची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सिडको परिसरातील बुरकूले हॉल भागातून एका मूकबधीर युवकाचे अपहरण करून संशयितांनी त्याच्यावर शारिरिक-मानसिक अत्त्याचार केल्याने त्या युवकाची प्रकृती खालावली आहे. यापुर्वीदेखील तपोवन भागातून एका परराज्यातील युवकाला रिक्षाचालकांनी रात्रीच्यावेळी गाठून भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉजवर आणून अशाचप्रकारे अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर पुन्हा याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत भद्रकाली भाजी बाजाराला लागून असलेल्या तलावडी येथील एका लॉजमध्ये सोमवारी (दि.२५) रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोघा अज्ञात संशयितांनी चक्क मूकबधीर युवकाला फूस लावून पळवून आणत त्याच्यासोबत जबरी संभोग केल्याची फिर्याद त्याच्या भावाने भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा अनोळखी संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरिक्षक गिरी करीत आहेत.
‘लॉज’च्या तपासणीकडे दुर्लक्ष
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत तलावडी, जुने नाशिक, भद्रकाली, खडकाळी, सारडासर्कल, चौकमंडई, पिंजारघाट आदि भागात लॉजची संख्या मोठी आहे. येथील लॉजची नियमितपणे तपासणी करण्याची मागणी होत आहे. लॉजमध्ये सर्रासपणे कोणीही बेकायदेशीरपणे कृत्य करून पसार होत असल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यानंतर पोलिसांकडून त्या घटनेचा तपास करत गुन्हेगारांचा शोध घेतला जातो. गुन्हेगारीच्या घटना घडण्यापुर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलिस ठाण्याकडून करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. केवळ मिशन आॅल आउटदरम्यानच या भागातील लॉजची तपासणी केली जाते, एरवी रान मोकळे सोडले जात असल्याचे समजते.