‘शाळांमध्ये लैंगिक शिक्षण द्या मोकळेपणाने’
By admin | Published: July 2, 2014 09:38 PM2014-07-02T21:38:57+5:302014-07-03T00:09:49+5:30
‘शाळांमध्ये लैंगिक शिक्षण द्या मोकळेपणाने’
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शाळांमधून लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्यात यावी, असे मत व्यक्त केले. या आधीही त्यांनी एड्सवर आळा घालण्यासाठी कंडोम वापरण्याऐवजी सुसंस्कार आणि वैवाहिक जीवनात एकनिष्ठता अधिक प्रभावी ठरेल, असे विधान करून वादाला संधी दिली होती. हर्षवर्धन यांच्या या वक्तव्यामुळे देशभर वाद निर्माण झाला आहे. आधीच देशात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असताना हे शिक्षण बंद करुन काय साध्य होणार इथपासून ते हे शिक्षण वेगळ्या पद्धतीने दिले पाहिजे, भारतीय संस्कृतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले पाहिजे इथपर्यंत अनेक गोष्टी चर्चील्या जाऊ लागल्या. खरं तर देशभरात ठिकठिकाणी विद्यार्थींनीवर होणारे अत्याचार बघता त्यांना त्यांच्या शरीराची माहिती देणे गरजेचे असताना, स्वत:चे संरक्षण करण्याचे महत्व सांगण्याची वेळ आली असताना आरोग्यमंत्र्यांनी असा पवित्रा घेतल्याने यांना नक्की काय अपेक्षीत आहे असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिलच पाहिजे यावर साऱ्यांचाच भर असल्याचे दिसते. ते कसे असले पाहिजे याविषयी ‘लोकमत’च्या विचार विमर्श व्यासपीठावर झालेल्या चर्चेचा हा गोषवारा...
आजकाल मुलांचं वयात येण्याच वय कमी झालं आहे आणि लग्नाच वय वाढल आहे त्यामुळे मधला गॅप मुलांच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. बाहेरची प्रलोभने, मिडीया, इंटरनेट, जाहिराती, पालक मुलांच्या संवादाचा अभाव या गोष्टींमुळे पालक आणि मुले दोघांमध्येही लैगिंक शिक्षणाविषयी गोंधळ वाढला आहे. मुलांना प्रश्न पडत आहेत पण पालकांना या प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत याचा प्रश्न पडला आहे. सोप्या पद्धत्तीने आणि शास्त्रीया आधारावर त्यांना लैगिंक शिक्षणाची माहिती दिली नाही तर ते इंटरनेट, पोर्नोग्राफी आदि मार्गाने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि चुकीच्या गोष्टी स्विकारतील. त्यामुळे लैंगिक शिक्षण मुलांना लहानपणापासून दिलेच पाहिजे पण ते ग्रेसफुली दिले पाहिजे, भारतीय संस्कृतीला अनुसरुन माहिती दिली गेली पाहिजे, आरोग्य संघटनेने दिला त्यांचा अधिकार शाबुत राहिला पाहिजे, सहजतेने, मोकळेपणाने, अपराधी भावना न ठेवता ते दिल पाहिजे, असा सुर आता उमटू लागला आहे.
बालरोगतज्ञ आणि समुदेशक डॉ. अतुल कणीकर यांनी ‘लैंगिक शिक्षण’ या शब्दावरच आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, हा शब्द चुकीचा आहे. याला फॅमिली लाईफ एज्युकेशन अर्थात जीवन कौशल्य प्रशिक्षण किंवा सेक्सच्युअॅलिटी एज्युकेशन असे म्हटले पाहिजे. पालक, शिक्षक यांनी या विषयाची माहिती मुलांना द्यावी, मग गरज पडली तरच बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, सपुदेशक यांच्याकडे जावे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मुलांना हे शिक्षण द्यायला सुरवात केली पाहिजे. त्यांना त्यांचे शरीराच्या अवयवांची ओळख करुन दिली पाहिजे. त्यानंतर ३ऱ्या वर्षी पुढची स्टेप, ४ थ्या वर्षी त्याच्या पुढची स्टेप असे टप्प्याटप्प्याने हे शिक्षण द्यावे. या शिक्षणाबरोबरच स्वच्छता, सुरक्षितता, माध्यमांची ओळख आदि कौशल्य त्यांना हसतखेळत, गोष्टी सांगत शिकवल्या पाहिजे.
‘सुजाण पालक’च्या कार्यकर्त्या पुष्पा जोशी यांनी मुलींबरोबरच मुलांनाही लैंगिक शिक्षण दिले जावे अशी भूमिका मांडली. बऱ्याचदा मासिक पाळी, वयात आल्यानंतर शरीरात होणारे बदल याविषयी आया आपल्या मुलींना महिती देतात पण मुलांना सहसा कुणी काही सांगत नाही. त्यामुळे मुलांच्या मनात अनेक प्रश्न तसेच रहातात. आपल्या जवळच्या नातेवाईकांचे चुकीचे स्पर्श मुलींना लवकर कळतात. मुलींकडे उपजतच तो सेन्स असतो. त्यामुळे अशावेळी पालकांनी मुलींना समजून घेतले पाहिजे. मुलांच्या मनातील शंकांचेही वेळच्या वेळी निरसन झाले पाहिजे. आणि यासाठी हे शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचच आधी प्रशिक्षण झाल पाहिजे. त्यांना तो विषय नीट समजला आणि हसतखेळत तो मुलांना शिकवण्याचे कौशल्य समजले म्हणजे हा विषय इतर विषयांप्रमाणे हलका आणि सहजसोपा होईल. त्याचे न्यूनगंड किंवा अपराधाची भावना नको.
बालमानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक डॉ. श्यामा कुलकर्णी म्हणाल्या की, लैंगिक शिक्षण असे न म्हणता या विषयाला जीवन शिक्षण, मुल्य शिक्षण असे म्हटले पाहिजे. मुलांंच मानसशास्त्र समजून घेऊन त्यांना त्यांच्या पद्धत्तीने ते दिल गेल पाहिजे. हे शिक्षण का महत्वाच आहे हे समजावून सांगितल पाहिजे. पण एखदा याच ज्ञान मुलांना दिल की आपली जवाबदारी संपली असे मानणे चुकीचे आहे. इथुनच आपली खरी जवाबदारी सुरु होते. मुले जसजसी मोठी होऊ लागतात, तसे नैसर्गिकपणे त्यांच्या शरीरात बदल होऊ लागतात. त्यांना भिन्नलिंगी आकर्षण वाटू लागते. त्यामुळे अशा टेंडर स्टेजमध्ये त्यांच्या गोलसेटिंगवर भर दिला पहिजे. त्यांना त्यांच्या छंदांची ओळख करुन दिली पाहिजे. खेळ, इतर अॅक्टीव्हीटीज त्यांना उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. अभ्यास, ध्येय याविषयी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. हार्मोन्समध्ये बबल होणारच आणि ते स्वाभाविकच आहे पण त्याची जागृती मुलांमध्ये झाली पाहिजे. तुम्हाला मित्र मैत्रिणी असू शकता, त्यांच्याशी तुम्ही मैत्री करावी, पण नको ते गिफ्ट आणि नको त्या ठिकाणी लिफ्ट हे प्रकार व्हायला नको. याविषयी मुलांना समजावून सांगण्याची जवाबदारी पालकांची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मैत्रीतली लक्ष्मणरेषा आखून घेता आली पाहिजे आणि तीच पालनही करता आल पाहिजे. लहानवयापासूनच आपली मुले योग्य ठिकाणी ठामपणे नाही म्हटली पाहिजे. यासाठी पालक जागृत हवे. लैंगिक शिक्षण मुलींनाच महत्वाची आहे आणि मुलांनी नाही असा गैरसमज आढळतो. पण तसे नाही. तर याचे ज्ञान नसेल तर दोघांनाही त्याचा त्रास होऊ शकतो.
आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी हे विधान केल्यानंतर विविध स्तरावरुन दोन मतप्रवाह समोर आले. हे शिक्षण दिल पाहिजे यात काही दुमतच नाही. फक्त ते कुणी, का आणि कशा पद्धतीने द्याव हे महत्वाच आहे. लैंगिक शिक्षण हा व्यापक विषय आहे. तो स्टेपबाय स्टेप आधी प्रशिक्षण देणाऱ्याने समजून घेतला पाहिजे आणि नंतर तो इतरांना शिकवला पहिजे. हे शिक्षण आपणच मनात न्यूनगंड ठेवून, अपराधाची भावना ठेवून, टार्गेट पुर्ण करायच आहे म्हणून हे काम उरकुन टाकू अशी भावना असता कामा नये. हे शिक्षण सहजसोप्या भाषेत आणि ग्रेसफुली दिल पाहिजे. हे शिक्षण देताना जसे शरीराच्या बदलावर भर दिला जातो तसेच मानसशास्त्रीय दृष्टीने काय बदल होतात तेही समजावून सांगितले पाहिजे. बदलत्या वयातील मुलांचे भावविश्व शिक्षकांना, पालकांना टिपता आले पाहिजे. १ ली पासून ते तरुणवयापर्यंत प्रत्येक टप्प्यात होणारे बदल मुलांना समजावून सांगितले पाहिजे.
स्त्रीरोगतज्ञ डॉ. निवेदिता पवार यांनी सांगितले की, शरीर रचनेची ओळख मुलांना लहान वयापासूनच करुन दिली पाहिजे.बऱ्याचशा शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स कंपन्यांकडून मुलींसाठी जनजागृती कार्यक्रम घेतले जातात. पण हे करताना या कंपन्यांचे प्रतिनिधी मुलींना एका बंद वर्गात बसवून समजावून सांगत नाही. त्यामुळे मुलींच्या मनात गोंधळ वाढतो. मुले आपल्याला हे का दाखवत नाहीत म्हणून कांगावा करतात. त्यामुळे असे न करता मुलेमुली दोघांनाही हा विषय सोपा करुन शिकवला पहिजे. वैद्यकिय ज्ञानाबरोबरच नैतिकमुल्यांच महत्वही मुलामुलींना सांगितल पाहिजे. त्यांना सर्वप्रकारचे स्पर्श कळले पाहिजे. पालक, शिक्षक यांनी लाजून हा विषय शिकवलाच नाही तर मुले इतर मार्गांनी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील पण त्यात गुंतागुंत वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे शिक्षण मुलांना शास्त्रीय पद्धत्तीने द्यावे आणि काय चांगल काय वाईट हे ओळखण्याइतपत मुले हुशार झाली पाहिजे.
लैंगिक शिक्षणाचा विषय शिकवताना आणि शिकताना संकोच, अपराधीपणाची भावना नको, तर इतिहास, भाषा याप्रमाणे हा विषयही सहजनेते समजावून घेतला पहिजे असे मत शिक्षण सामाजिक कार्यकर्ते मुकूंद दीक्षित यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, आदिवासी समाजात ज्याप्रमाणे अपराध, संकोच न बाळगता सामाजिक जीवन जगले जाते तितकी सहजता हा विषय समजावून घेताना इतरांमध्येही आली पाहिजे. नैसर्गिक जे आहे ते तसेच्या तसे आपण स्विकारले पाहिजे, ते अभ्यासले पाहिजे, जाणून घेतले पाहिजे हेच तत्व लैंगिक शिक्षणालाही लागू पडतं. यातला गिल्ट बाजूला ठेवून हे शिक्षण सन्मानाने दिले पाहिजे. इयत्तानुसार, शाळांच्या स्तरानुसार त्या शिक्षणात बदल केले पाहिजे.
एकंदर हा विषय अभ्यासक्रम कायम ठेवून तो चांगला, सहजसोपा असा तयार करुन, अनौपचारिक ढाच्यात बसवून व हसतखेळत शिकविला पहिजे. सरकारने याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.