‘शब-ए-मेराज’: ‘त्या’ निंदनीय घटनांच्या निषेधार्थ नाशिकमध्ये ५० मशिदींबाहेर स्वाक्षरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:17 PM2018-04-14T15:17:07+5:302018-04-14T15:17:07+5:30
देशभर हॅशटॅगसह ‘रेपरोको’ अभियान हाती घेतले गेले आहे. अशा अमानवी घटनांच्या निषेध स्वाक्षरी अभियानाने नोंदविला जाणार असून मृत मुलींसाठी प्रार्थनाही केली जाणार आहे.
नाशिक : देशामधील जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश या राज्यांत घडलेल्या संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणाऱ्या अमानवी अशा दुर्देवी बलात्काराच्या घटनेने सर्वच हादरले आहेत. देशभरातून सर्व जाती-धर्माचे लोक रस्त्यावर उतरून या घटनांचा निषेध करत असून संशयित आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. नाशिकमधील ५० मशिदींच्या प्रवेशद्वारावर आज रात्री ‘शब-ए-मेराज’च्या औचित्यावर या घटनांंचा निषेध म्हणून शरियत बचाव कमिटीच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असल्याचे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले.
इस्लाममध्ये ‘शब-ए-मेराज’ या रात्रीला विशेष महत्त्व असून या रात्रीनिमित्त मशिदींमध्ये नमाजपठण व धार्मिक कार्यक्रमांसाठी समाजबांधवांची मोठी गर्दी लोटते. या पार्श्वभूमीवर शरियत बचाव कमिटीच्या वतीने स्वाक्षरी अभियान घेतले जाणार आहे. जम्मूच्या कठुआ आणि उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये घडलेल्या पाशवी बलात्काराच्या घटनांचा निेषेधार्थ अधिकधिक लोकांनी स्वाक्ष-या करुन संबंधित संशयित आरोपींना फाशीच्या शिक्षेच्या मागणीला समर्थन दर्शवून सरकारपर्यंत भावना पोहचाव्या, हा उद्देश आहे. देशभर हॅशटॅगसह ‘रेपरोको’ अभियान हाती घेतले गेले आहे. अशा अमानवी घटनांच्या निषेध स्वाक्षरी अभियानाने नोंदविला जाणार असून मृत मुलींसाठी प्रार्थनाही केली जाणार आहे. तसेच बलात्कार करणा-या नराधमांना पाठीशी घालणा-यांचा निषेधही यावेळी केला जाणार आहे. खतीब यांनी यासंदर्भात शरियत बचाव कमिटीच्या पदाधिका-यांशी चर्चा करुन शहरातील सुमारे ५० मशिदींच्या धर्मगुरूंना (मौलाना) याबाबत कल्पना दिली असून स्वाक्षरी अभियानाची व्यवस्था करण्याचे सुचविले आहे.
शब-ए-मेराजनिमित्त बहुतांश समाजबांधव शहर व परिसरातील विविध सुफीसंतांच्या दर्ग्यांवर दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यामुळे हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी यांचा बडी दर्गा, पांडवलेणी येथील हजरत सय्यद मलिकशाह हुसेनी बाबा दर्गा, आनंदवल्ली येथील शहीद हजरत सय्यद हसन रांझेशाह बाबा दर्गा, उपनगर येथील हजरत पालखीवाले बाबा दर्गा, नाशिकरोड येथील हजरत गैबनशाहवली बाबा दर्गांवरही स्वाक्षरी अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शरियत बचाव समितीचे काही कार्यकर्ते या दर्ग्यांवर रात्री थांबून स्वाक्षरी अभियानाची व्यवस्था करणार आहेत. तसेच संबंधित दर्ग्यांच्या विश्वस्त मंडळांनाही याबाबत सुचना करण्यात आली आहे.