शबरीमाता धर्मसंस्कार सोहळा संपन्न
By admin | Published: January 17, 2017 01:54 AM2017-01-17T01:54:13+5:302017-01-17T01:54:26+5:30
भालूर : आदिवासी संस्कृती नृत्य मंडळाचे सादरीकरण
मनमाड : भालूर येथे श्री रामभक्त शबरीमाता धर्मसंस्कार पुण्यतिथी व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समारोपानिमित्त गावातून काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आलेले आदिवासी संस्कृती नृत्य विशेष आकर्षण ठरले. भालूर येथे गोपीनाथ महाराज जिरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रामभक्त शबरीमाता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीचे माजी अध्यक्ष दिगंबर निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण तर वाळुराम पवार यांच्या हस्ते कलश पूजन, नंदकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते निशाणापूजन करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला होता. दररोज पहाटे काकडा भजन, हनुमान चालिसा, संगीत मालिका पारायण, गाथा भजन, हरिपाठ व कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात ह.भ.प. गंगारामजी राउत, पंढरीनाथ महाराज पगार, रामप्रकाशानंदगिरी महाराज यांचे कीर्तन झाले. प्रियंका शेवाळे यांच्या राजमाता जिजाऊंच्या जीवनावरील व्याख्यानाने श्रोेते मंत्रमुग्ध झाले. माजी आमदार संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य अशोक जाधव, राजाभाऊ पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या योगदानातून महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच संदीप अहेर, मविप्रचे माजी संचालक साहेबराव पाटील, माजी सरपंच विठ्ठल अहेर, शिवाजी ढगे, संदीप शिंदे, नामदेव पाटील, शिवाजी महाराज तळेकर, रमेश निकम, देवीदास निकम, विलास अहेर, संजय निकम, दिनकर पाटील, पुंडलीक उगले, राजेंद्र तळेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)