‘सावळे सुंदर रूप मनोहर...’ अभंग संध्या रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:10 AM2019-07-14T01:10:26+5:302019-07-14T01:10:46+5:30
आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाने प्रेक्षकांना दिली.
नाशिक : ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरापासून प्रारंभ झालेले स्वर ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ असे नाचत-बागडत आले अन् ‘सावळे सुंदर रूप मनोहर’अशी लडीवाळ वळणे घेत ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’पर्यंत सर्व वातावरण विठ्ठलमय करून गेले.
आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाने प्रेक्षकांना दिली.
तेराव्या शतकापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत जनाबाई, संत पुरंदर दासानंद, संत हरिदास, संत जगन्नाथ दास यांनी विठ्ठलाला अर्पण केलेले असंख्य अभंग वेगवेगळ्या पद्धतीने रचले. त्या रचनांमधील भक्तिरस आणि त्यांना अवीट चाल आणि सुरेल गळ्यांमधून ऐकण्याची अनुभूती प्रेक्षकांना मिळाली. व्यंकटेश यांनी ‘आलीया संसार उठा वेगे करू, ये गं ये गं विठाबाई ’आणि कानडी संत जगन्नाथ दास आणि संत हरिदासांच्या रचना सादर करीत दाद मिळवली. जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘एकदा पंढरी पहावी, सावळे सुंदर, अगा वैकुंठीच्या राया, पंढरीचे भूत मोठे आणि कानडा राजा पंढरीचा’ यांसह अन्य भक्तिगीते सादर करीत प्रेक्षकांना भक्तिरसात न्हाऊ घातले.
तर सावनीने ‘रामरंगी रंगले, मायबाप केवळ काशी, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ ही गिते सादर केली. प्रमुख गायकांना सहकलाकार प्रसाद पाध्ये (तबला), प्रताप आव्हाड (पखवाज), सूर्यकांत सुर्वे (साईड ºिहदम), आदित्य ओक (संवादिनी), एस. आकाश (बासरी), नरेंद्र नायक (संवादिनी) यांची सुमधुर साथ लाभली. गेयता व्यास यांनी प्रास्ताविक केले.