रोकडोबा पारावरील वटवृक्षाची सावली हरपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:27 AM2017-10-11T01:27:11+5:302017-10-11T01:27:49+5:30
पुराच्या पाण्याचा वेढा, वाढलेला पर्णसंभार...पारंब्यांचा हरविलेला आधार आणि वयाची पूर्ण झालेली शंभरी यामुळे गोदाकाठावरील रोकडोबा व्यायामशाळेला लागून असलेल्या ‘रोकडोबा पारा’वरील वटवृक्ष मंगळवारी (दि.१०) दुपारी अचानकपणे उन्मळून पडला. यामुळे या पारावरील वटवृक्षाची सावली हरपली.
नाशिक : पुराच्या पाण्याचा वेढा, वाढलेला पर्णसंभार...पारंब्यांचा हरविलेला आधार आणि वयाची पूर्ण झालेली शंभरी यामुळे गोदाकाठावरील रोकडोबा व्यायामशाळेला लागून असलेल्या ‘रोकडोबा पारा’वरील वटवृक्ष मंगळवारी (दि.१०) दुपारी अचानकपणे उन्मळून पडला. यामुळे या पारावरील वटवृक्षाची सावली हरपली.
रोकडोबा पार हा जुन्या नाशकातील जुुना पार आहे. बुधवारचा आठवडे बाजार आणि ज्येष्ठांच्या रंगणाºया गप्पांचा इतिहास या पाराभोवती फिरतो. पारावर गणपती मंदिर असून, भाविकांचे श्रद्धास्थान आहे. काही वर्षांपूर्वी पाराचे मजबुतीकरण करण्यात आले होते. या पाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पारावर वड, पिंपळ यांची एकत्रित झालेली वाढ. पाराभोवती दोन पिंपळ व एक डेरेदार वटवृक्ष वाढलेले होते. त्यापैकी वटवृक्ष उन्मळून पडला. त्यामुळे जीर्ण व धोकादायक झालेला पिंपळाचा एक वृक्षही जो वटवृक्षासोबत वाढलेला होता तोदेखील सुरक्षितततेच्या दृष्टिकोनातून काढून घेतला गेल्याची माहिती नगरसेवक शाहू खैरे यांनी दिली. दुपारी वटवृक्ष पडल्याची माहिती तत्काळ पंचवटी अग्निशामक दलाला कळविण्यात आली. झाडांच्या फांद्यांखाली दोन रिक्षा दाबल्या गेल्याने नुकसान झाले. सुदैवाने कुठलाही अनर्थ झाला नाही.