सिन्नर येथे शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा
By admin | Published: September 9, 2015 11:05 PM2015-09-09T23:05:48+5:302015-09-09T23:06:28+5:30
सिन्नर येथे शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा
सिन्नर : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलामध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत शेठ ब. ना. सारडा विद्यालय, चांडक कन्या विद्यालय व हिवरे येथील माध्यमिक विद्यालयाचे १२० विद्यार्थी सहभागी झाले होते.
शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे हे सहावे वर्ष आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे फेलोज सदस्य अनिल करवा, सेवानिवृत्त कलाशिक्षक द. वा. मुळे, चांडक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक स्रेहल महाजन उपस्थित होते.
सेवानिवृत्त कलाशिक्षक द. वा. मुळे, विद्यमान कलाशिक्षक राहुल मुळे, गीतांजली धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्यासाठी चार दिवस आधीच माती भिजवण्यात आली होती. चांगली भिजलेली शाडू माती व्यवस्थित मळून घेतली. प्रथम मूर्तीचा पाट तयार करत त्यावर गणेश मूर्ती साकारण्यास प्रारंभ केला. बांबूच्या काडीपासून विद्यार्थ्यांनी स्वत: बनविलेल्या कोरण्यांच्या सहायाने नको असलेली माती बाजूला केली. कलाकुसरीचे दर्शन घडवत श्रीगणेशाची वैशिष्ट्यपूर्ण विविध रुपे साकारली जात होती. कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता एकाग्रतेने मूर्ती घडविण्यात विद्यार्थी रमल्याचे चित्र होते. मूकपणे परस्परांना सहकार्य करत नवनवीन कल्पना प्रत्यक्षात साकारताना आकर्षकतेसाठी बदल सुचवून, चांगल्या कामाचे कौतुक करून एकमेकांना प्रोत्साहन देत होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पर्यावरण नवनिर्मितीचा, स्व-निर्मितीचा आनंद दिसत होता. मुख्याध्यापक महाजन यांनी प्रास्ताविक केले. कलाशिक्षक मुळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)