कोरोना बळींच्या आकडेवारीत सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:45+5:302021-06-10T04:11:45+5:30
नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला. मार्च आणि एप्रिल महिन्यात दररोज नवीन बाधित आढळणाऱ्यांच्या संख्येत नवनवीन उच्चांक ...
नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर पाहण्यास मिळाला. मार्च आणि एप्रिल महिन्यात दररोज नवीन बाधित आढळणाऱ्यांच्या संख्येत नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत होते. सुमारे साडे सात हजारांवर रुग्ण संख्या गेल्याने नाशिकमध्ये रुग्णालयांत खाटा मिळत नव्हत्या. दुसरीकडे कोरोनाबळींच्या संख्येने नाशिक महापालिकेला अमरधाममध्ये वेटिंग संपविण्यासाठी ॲपदेखील काढावे लागले होते. त्या काळी मृत्यूचे तांडव होते ही वस्तुस्थिती होती. मात्र आता रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना मृत्यू पावणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे नाशिककर बुचकळ्यात पडले आहेत.
मात्र शासकीय यंत्रणांशी चर्चा केल्यानंतर शासकीय आणि खासगी आरोग्य सेवेतील गाेंधळ उघड झाला आहे. अनेक रुग्णालयांनी त्यांच्याकडील मृत रुग्णांच्या नोंदीच शासकीय पोर्टलवर अपलोड केल्या नव्हत्या. त्या आता केल्या जात असून त्यामुळेच बळींचा आकडा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी त्यास दुजोरा दिला. अनेक रुग्णालयांच्या नोंदी आता विलंबाने अपलोड होत असल्याचे त्यांनी सांगितले तर कोविड सेल प्रमुख डॉ. आवेश पलेाड यांनी यासंदर्भात अगोदरच अनेक रुग्णालयांना नोटिसा बजावल्याचे नमूद केले.
इन्फो..
ग्रामीणलाही नोंदीत विलंब
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुळातच तंत्रज्ञान कुशल कर्मचाऱ्यांची वानवा आणि बळींच्या नोंदीबाबत असलेली अनास्था यामुळेच ग्रामीणच्या बळींची नोंद तीन-चार दिवस उशिरानेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. तसेच तालुका स्तरावरील खासगी रुग्णालयांकडूनदेखील मृतांच्या नोंदी तातडीने कळविण्यात हेळसांड झाल्यानेच ग्रामीणमधील काही मृत्यूंची नोंद उशिराने झाली आहे. त्यामुळेच ग्रामीणमधील नवीन बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत असली तरी अद्यापही तेथील बळींच्या नोंदीत फारशी घट आली नसल्याची चर्चा आरोग्य वर्तुळात होत आहे.
इन्फो...
गेल्या २१ एप्रिल रोजी जिल्ह्यात काेरोनामुळे ९० जणांचा मृत्यू झाल्याची सर्वाधिक उच्चांकी नोंद झाली असली तरी त्या दिवशी ऑक्सिजन गळतीमुळे नाशिकमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र बुधवारी (दि. ९) अचानक ७२ बळींची नोंद झाल्याने गोंधळ उघड झाला.