संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला
By admin | Published: February 11, 2015 12:51 AM2015-02-11T00:51:00+5:302015-02-11T00:55:18+5:30
संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला
भक्तीरसात आकंठ बुडालेल्या भाविकाला आस असते भगवंताची. भगवंताच्या दर्शनाला निघालेल्या भक्तांच्या आड वय, श्रम आणि वेदनांचा व्यत्यय येत नसल्याचा प्रत्यय संत गजाननाच्या दर्शनासाठी वनोजाहून ११५ किलोमीटर अंतर पायी कापणार्या ७६ वर्षीय भाविकाकडे बघून येतो. वाशिम जिल्ह्यातील उकळी पेन येथील नामदेव राऊत हे या भक्ताचे नाव आहे. त्यांचे वय ७६ वर्षे असून, या वयात ते ११५ किलोमीटर अंतर पायी कापतात.
नामदेव राऊत दरवर्षी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जातात. त्यासाठी गत ११ वर्षांंपासून ते पायदळवारीमध्ये सहभागी होतात. वनोजा येथून हृषिकेश महाराजांची पालखी दरवर्षी शेगावसाठी रवाना होते. या पालखीसोबत वनोजा येथील महिला, पुरूष, तरूण, वयोवृद्ध नागरिक दरवर्षी शेगावला दर्शनासाठी जातात. वनोजा ते शेगापर्यंंतचे अंतर ११५ किमी आहे. ४ फेब्रुवारी रोजी वनोजाहून निघालेली ही पालखी ९ फेब्रुवारीपर्यंंत शेगावला पोहोचते. ११ फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी परततात. या पालखीत उकळी पेन येथील नामदेव राऊतही सहभागी होतात. यापूर्वी राऊत यांनी पंढरपूर, आळंदी येथे पायदळ वारीत जाऊन भगवंताचे दर्शन घेतले आहे. पायदळ वारीबद्दल मनोगत व्यक्त करताना राऊत म्हणाले, की भगवंताची आस लागल्यामुळे आपण संत गजानन महाराजांच्या पायदळ वारीत सहभागी होतो. यामुळे आपल्याला मनस्वी आनंद मिळतो. पायी चालताना थकवा किंवा त्रास कधीच होत नाही, असे त्यांनी सांगितले.