शहाजहाँनी ईदगाह मैदानात सामूहिक नमाज अदा, भारताच्या प्रगतीसाठी 'दुवा'
By अझहर शेख | Published: April 11, 2024 02:59 PM2024-04-11T14:59:35+5:302024-04-11T15:23:57+5:30
गेल्या महिनाभरापासून रमजान पर्व सुरू होते. यानिमित्ताने समाजबांधवांनी महिनाभर निर्जली उपवास (रोजे) केले.
नाशिक : आपापसांत प्रेम, बंधुभाव, करुणा व माणुसकीची शिकवण देणारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद नाशिक शहर व परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने गुरुवारी (दि.११) साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानात विशेष नमाजपठणाचा सोहळा शांततेत पार पडला. शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सोहळ्याचे नेतृत्व केले.
गेल्या महिनाभरापासून रमजान पर्व सुरू होते. यानिमित्ताने समाजबांधवांनी महिनाभर निर्जली उपवास (रोजे) केले. 'अल्लाह'च्या उपासनेत स्वतःला अधिकाधिक व्यस्त ठेवण्यास प्राधान्य दिल्याचे बघावयास मिळाले. बुधवारी 30 उपवास पूर्ण होऊन संध्याकाळी रमजान पर्वची सांगता झाली.गुरुवारी पहाटेपासूनच मोहल्ल्यांमध्ये ईदची लगबग सुरू झाली होती.
ईदगाह मैदानात नमाजपठण सोहळ्याला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. ईदगाहकडे येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारंपरिक नवीन पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी अशा पोशाखात नागरिक हजारोंच्या संख्येने मैदानात जमले होते. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांभोवती शुचिर्भूत (वजु) होण्यासाठी पाण्याचे नळ तात्पुरते बसविण्यात आले होते. सकाळी सव्वा नऊ वाजता मौलाना जफर यांनी प्रवचनाला प्रारंभ केला. त्यांनी रमजान ईद चे महत्व, ईदच्या दिवशी करावयाचे कर्तव्ये, जबाबदाऱ्याविषयी प्रकाश टाकला. दरम्यान, नमाज अदा करण्याअगोदर नागरिकांनी जकात, फित्राची (धान्यदान) रक्कम दान केली.
सकाळी सव्वा दहा वाजता खतीब ए शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी नमाजपठणाची पद्धत समजावून सांगितली आणि नमाज पठणास सुरुवात केली. विशेष नमाज अदा केल्यानंतर अरबी भाषेतून खतीब यांनी विशेष 'खुतबा' वाचला. यावेळी उपस्थितांनी मौन ठेवत एकाग्रतेने खुतबा ऐकला. यानंतर संपुर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी व भारताच्या उत्तरोत्तर सर्वांगीण प्रगतीकरिता दुवा करण्यात आली.
प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे उपस्थितांनी सामूहिक पठण केले आणि सोहळ्याची सांगता झाली. शहर ए खतीब यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त अशोक करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, ऍड.यतीन वाघ, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ आदी उपस्थित होते.