शहाजहॉनी ईदगाह : देशाची एकात्मता बळकट करण्याचा समाजबांधवांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:33 PM2018-06-16T12:33:09+5:302018-06-16T12:33:09+5:30

नमाजपठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव मैदानात जमले होते. सकाळी साडे आठ वाजेपासून मैदानाच्या दिशेने समाजबांधवांची पावले चालत होती.

Shahajahani Idgah: Message to the community to strengthen the unity of the country | शहाजहॉनी ईदगाह : देशाची एकात्मता बळकट करण्याचा समाजबांधवांना संदेश

शहाजहॉनी ईदगाह : देशाची एकात्मता बळकट करण्याचा समाजबांधवांना संदेश

Next
ठळक मुद्देशहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नमाजपठणअकरा वाजता सोहळ्याचा समारोप विशेष दुवाने करण्यात आला.महापालिकेच्या वतीने पाण्याची मुबलक व्यवस्था

नाशिक : बंधुभाव, सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद शनिवारी (दि.१६) शहरात अभुतपूर्व उत्साहात पारंपरिक पध्दतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सकाळी विशेष नमाज ऐतिहासिक शहाजहॉनी ईदगाह मैदानावर अदा केली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्याने डोळ्यांची पारणे फेडली.
मानवतेची शिकवण आणि आत्मशुध्दीचे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता होऊन मुस्लीम बांधवांनी पारंपरिक प्रथेनुसार उर्दू महिना शव्वालच्या १ तारखेला शनिवारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. ईदनिमित्त सालाबादप्रमाणे ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. नमाजपठणासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव मैदानात जमले होते. सकाळी साडे आठ वाजेपासून मैदानाच्या दिशेने समाजबांधवांची पावले चालत होती. पारंपरिक पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी परिधान करुन विशेष श्लोक (तस्बीह) पठण करत घरातून मुस्लीम बांधव ईदगाहच्या दिशेने बाहेर पडले. ईदगाह मार्गावर विविध लोकप्रतिनीधींसह राजकिय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी नातवंडांसोबत ईदगाहवर हजेरी लावली. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर शुचिर्भूत होण्यासाठी महापालिकेच्या वतीने पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती.
नऊ वाजेच्या सुमारास हाजी सय्यद मीर मुख्तार यांनी ईदगाहवर प्रवचनास प्रारंभ केला. रमजान पर्वमध्ये केलेली उपासना सार्थकी लागावी, यासाठी त्यांनी यावेळी धनिक मुस्लीमांना नमाजपठणापुर्वी ‘जकात’, ‘फित्रा’ देण्याचे आवाहन केले. एकात्मता, अखंडता, आपआपसांमधील बुंधभाव ही आपल्या देशाची ताकद आहे. देशाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी एकात्मता अधिकाधिक बळकट करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. दहा वाजून दहा मिनिटाला खतीब यांनी नमाजपठणाला प्रारंभ केला. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरुदोसलामचे उपस्थित जनसमुदायाकडून पठण करण्यात आले. अकरा वाजता सोहळ्याचा समारोप विशेष दुवाने करण्यात आला. यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Shahajahani Idgah: Message to the community to strengthen the unity of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.