शहीद निनादवर होणार आज अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:23 AM2019-03-01T00:23:35+5:302019-03-01T00:24:25+5:30
नाशिक : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचे पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले असून, शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक अमरधामनजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, लखनऊ येथे असलेले निनाद यांचे कुटुंब गुरुवारी दुपारी नाशकात निवासस्थानी परतले असून, निनादचे नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळींसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

श्रीनगरनजीकच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती, त्यात मूळ नाशिकचे रहिवासी असलेले स्क्वॉड्रन लिडर निनाद मांडवगणे यांच्यासह एअर फोर्सचे सहा अधिकारी मृत्युमुखी पडले. दुर्घटना घडली तेव्हा निनाद मांडवगणे यांचे आई, वडील लखनऊ येथे निनाद यांच्या पत्नीच्या घरी होते. तेथे त्यांना दुपारी दोन वाजता हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून या दु:खद घटनेची खबर देण्यात आली. नाशिक-पुणे रोडवरील डीजीपीनगर येथील बॅँक आॅफ इंडिया कॉलनीतील श्री साईस्वप्न को. आॅप. सोसायटीत मांडवगणे कुटुंब राहते. शहीद निनाद यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतल्यामुळे बुधवारी रात्री हवाई दलाने शहीद निनाद यांच्या लखनऊ येथे आई, वडील, पत्नी व मुलगी अशा चौघांची नाशिक येथे पाठविण्यासाठी विमानाने सोय केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मांडवगणे कुटुंबीय लखनऊ येथून इंडिगो विमानाने मुंबईत दाखल झाले. दुपारी खासगी वाहनाने तीन वाजेच्या सुमारास ते निवासस्थानी पोहोचले. दरम्यान शहीद निनाद यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने सायंकाळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, आदी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली.रात्री उशिरा पार्थिवाचे आगमनशहीद निनाद यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी श्रीनगर येथून दिल्लीच्या पालम या हवाई दलाच्या विमानतळावर विशेष विमानाने सायंकाळी सव्वापाच वाजता आणण्यात आले. तेथे हवाई दलाचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर विशेष विमानाने रात्री ओझर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी तसेच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. शुक्रवारी सकाळी शहीद निनाद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने रात्रभर ओझर हवाई दलाच्या इलेक्ट्रिक फ्रीज रुग्णवाहिकेत पार्थिव ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता ओझरहून शहीद निनाद यांचे पार्थिव त्यांच्या बँक आॅफ इंडिया कॉलनीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन तासांनी शासकीय इतमामात अंत्ययात्रा काढण्यात येईल. मांडवगणे यांचे निवासस्थान ते अमरधाम हे साधारणत: पाच किलोमीटरचे अंतर असल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतुकीचे नियोजनही केले आहे.