शाहिरांनी समाज परिवर्तनासाठी प्रेरणा दिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:05 AM2019-02-23T01:05:36+5:302019-02-23T01:06:01+5:30
लोककला ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शाहिरांनी आपल्या बुलंद आवाज आणि लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी केले.
नाशिक : लोककला ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शाहिरांनी आपल्या बुलंद आवाज आणि लेखणीच्या माध्यमातून समाज परिवर्तनाला नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी केले. मविप्र शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. १८) रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, अॅड. एकनाथ पगार, नामदेव शिंदे, दत्ता पाटील, डॉ. आर. डी. दरेकर, एस. के. शिंदे, डॉ. डी. डी. काजळे उपस्थित होते.
यावेळी संस्कार आणि संस्कृती आपल्याला आपल्या घरातूनच मिळत असते असे सांगत मी जास्त शिकलो नाही, पुस्तकेच वाचली नाही, मात्र माणसं वाचायला शिकलो, हा वारसाही आपल्या कटुंबातूनच मिळाल्याचे उमप यांनी सांगितले. यावेळी यांच्यासह व्यवस्थापन मंडळावर नियुक्ती झालेले प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्यासह सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. व्ही. एस. काळे, डॉ. जे. एस. आहेर, डॉ. डी. पी. पवार यांचा सन्मान करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट खेळाडू, पीएचडी, नेट-सेट उत्तीर्ण प्राध्यापक व विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार व प्रा. तुषार पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. बी. जे. भंडारे यांनी आभार मानले.