श्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळेच शेख यांचे राजीनामा नाट्य?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 09:25 PM2021-10-14T21:25:34+5:302021-10-14T21:26:36+5:30
मालेगाव : गेल्या आठवड्या भरापूर्वी कॉंग्रेसच्या झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार तथा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रशीद शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडताना राजकारणातून निवृत्ती घेईल मात्र इतर पक्षात जाणार नाही, असे विधान केले होते. परंतु कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या दुर्लक्षपणामुळेच शेख रशीद यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे नाट्य घडल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

मालेगावी कॉंग्रेसचा निष्ठावंत गट आहे. स्वातंत्र्य काळानंतर मालेगावचे पूर्व भागातील राजकारण कॉंग्रेस भोवतीच झाल्याचे दिसून आले आहे. माजी आमदार रशीद शेख यांना दोनदा तर त्यांचे पुत्र आसीफ शेख यांना एक वेळेस व हारुण अन्सारी व आयेशा हकीम यांनी प्रत्येकी एक वेळेस कॉंग्रेसतर्फे आमदारकी भुषविली आहे. कॉंग्रेसचे तब्बल पाच वेळा आमदार मालेगाव शहरातून निवडून गेले आहेत. तत्कालीन नगरपालिकेत कॉंग्रेसकडे नगराध्यक्षपद देखील होते. तसेच महापालिकेच्या राजकारणातही कॉंग्रेसचे कायम वर्चस्व दिसून आले आहे. महापालिका स्थापनेच्या दोन दशकांच्या कार्यकाळात कॉंग्रेसने चार वेळा महापौर पद पटकावत महापालिकेची सत्ता हस्तगत केली आहे. सध्या महापालिकेवर कॉंग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे.
मालेगावी पक्ष बळकट असताना माजी आमदार आसीफ शेख यांच्या पाठोपाठ माजी आमदार रशीद शेख यांनीही पक्ष शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या मेळाव्यात शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वार्थी राजकारण करीत असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच राजकारणातून सेवानिवृत्ती घेईल; मात्र इतर पक्षात जाणार नाही, असे विधान केले होते.
कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मालेगाव शहर कॉंग्रेसकडे दुर्लक्ष केल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे राजकारण खिळखिळे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या महापालिकेत कॉंग्रेसचे २७ नगरसेवक निवडून गेले आहेत. महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांनी येऊन ठेपली असताना कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने अचानक प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत पक्षश्रेष्ठींबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
कार्यकर्ते मात्र बुचकळ्यात
वरिष्ठ पातळीवर दबाव आणण्यासाठी माजी आमदार शेख यांनी राजीनामा, तर दिला नाही ना याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आसीफ शेख यांच्या राजकारणाला कुठे दगा, फटका बसू नये म्हणून सावध भूमिका घेत शेख यांनी राजकीय खेळी केल्याचेही बोलले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या घडामोडींमुळे सर्वसामान्य कॉंग्रेसचा कार्यकर्ता पुरता बुचकळ्यात पडला आहे.