गडावर शाकांबरी महोत्सव
By Admin | Published: January 17, 2016 09:53 PM2016-01-17T21:53:53+5:302016-01-17T21:57:19+5:30
गडावर शाकांबरी महोत्सव
वणी : सप्तशृंगगडावर रविवारपासून (दि. १७) शाकांबरी महोत्सवास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. २३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासातर्फे देण्यात आली.
रविवारी (दि. १७) न्यासाचे सदस्य डॉ. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते प्रारंभी नवचंडी पालखी पूजनाने सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. दिनांक २१ ते २३ जानेवारी या कालावधीत लक्ष्मीनारायण महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शाकांबरी महोत्सवासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. वर्षभरात चार नवरात्र येत असतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात शारदीय नवरात्र, चैत्र शुक्ल पक्षात नवरात्री, तृतीय व चतुर्थ नवरात्र माघ व आषाढ महिन्यात साजरी करण्यात येते. देशभरात शाकांबरी देवीची तीन शक्तिपीठे आहेत. राजस्थान राज्यातील सिकर जिल्ह्यातील उदयपूर वाटीजवळ सकरायदेवी, सांभर जिल्ह्यात शाकंभर देवी, तर उत्तर प्रदेशातील मेरठजवळील सहारनपूर येथे ही शक्तिपीठे आहेत. शाकांबरी देवीचे प्रमुख स्थान अरावली पर्वताच्या मध्यावर आहे. शाकांबरी देवीच्या शरीरातून उत्पन्न घटकातून भूतलावरील मानवजातीचे भरणपोषण होते. या कृतज्ञतेच्या भावनेतून शाकांबरी उत्सव साजरा करण्यात येतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्राबरोबर परराज्यातील भाविकांची उत्सव सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहाणार असल्याच्या प्रतिवर्षीच्या अनुभवास अनुसरून योग्य ते नियोजन करण्यात आल्याची माहिती न्यास व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व सहायक भगवान नेरकर यांनी दिली. (वार्ताहर)