शाकंभरी देवी यात्रा आज नाशकात
By Admin | Published: December 28, 2016 01:30 AM2016-12-28T01:30:34+5:302016-12-28T01:30:45+5:30
शाकंभरी देवी यात्रा आज नाशकात
नाशिक : राजस्थान येथील शाकंभरी मातेच्या मंदिरापासून भारत भ्रमंतीवर प्रथमच निघालेली अखंड ज्योत दिव्य गुणगाण यात्रा बुधवारी (दि.२८) संध्याकाळी नाशकात पोहचणार आहे.
यात्रेमध्ये पंधरा ते वीस भाविक असून आकर्षक चित्ररथामध्ये देवीची मूर्ती व अखंड तेवत असलेल्या ज्योतीचा समावेश आहे. राजस्थान येथील शाकंभरी मंदिरापासून नोव्हेंबर महिन्याच्या आठ तारखेला यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ही यात्रा एकूण ६४ दिवसांची असून संपूर्ण भारतभरात भ्रमंती करणार आहे. चार दिवसांपूर्वीच शुक्रवारी (दि.२३) या यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश झाला असून, गोंदियाहून यात्रा अकोल्यापर्यंत पोहचली आहे. २७ तारखेला यात्रा औरंगाबादमध्ये येणार असून, २८ तारखेला संध्याकाळी धुळे, मालेगावमार्गे नाशकात येणार असल्याची माहिती ताराचंद गुप्ता व श्याम ढेढिया यांनी दिली. संध्याकाळी पाच वाजता मते नर्सरी, गंगापूररोड श्रीकृष्ण हॉल येथे यात्रेकरू चित्ररथासह दाखल होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. भजन-कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना यात्रेचे दर्शन घेता येणार आहे. राणेनगर येथील सुमंगल यात्री निवास, श्रीमंगल कॉम्प्लेक्समध्येही भाविक उपस्थित राहू शकता, अशी माहिती संयोजकांनी दिली. (प्रतिनिधी)विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनयात्रा नाशकात आल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, शाकंभरी देवीचे भजन गायन होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. ही यात्रा जानेवारी महिन्याच्या ११ तारखेला पुन्हा सकराय धाम राजस्थान येथे पोहचणार आहे. संपूर्ण देशभरात शाकंभरी देवीचे गुणगाण करून भक्त परिवाराला अखंड ज्योतीचे दर्शन घडविणे हा या यात्रेमागील मुख्य उद्देश आहे.