‘साक्षी गणेश’चा उत्सव यंदा मंडपाविना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:09 AM2019-08-31T01:09:37+5:302019-08-31T01:10:04+5:30
पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान तसेच नाशिकमध्ये वाहतुकीचा उडालेल्या बोजवाराचे भान ठेवत मानाच्या गणपतींमध्ये स्थान असलेल्या भद्रकालीतील साक्षी गणेश मंडळाने यंदा मंडप न घालता मंदिरालाच सजावट करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान तसेच नाशिकमध्ये वाहतुकीचा उडालेल्या बोजवाराचे भान ठेवत मानाच्या गणपतींमध्ये स्थान असलेल्या भद्रकालीतील साक्षी गणेश मंडळाने यंदा मंडप न घालता मंदिरालाच सजावट करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भद्रकाली परिसरात दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्याची चिन्हे आहे.
दरवर्षीच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने २० फूट बाय २० फूट अशा आकाराचा मंडप टाकून जवळपास निम्मा रस्ता व्यापून टाकला जात होता. मात्र आधीच सर्वत्र वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे अधिकाधिक मोकळा ठेवण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे. गत चार दशकांहून अधिक काळापासून साक्षी गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक कार्याची परंपरा जोपासत गणेशोत्सव साजरा केला जातो. सामाजिक भान कायम राखत मंडळाने आणि सौरभ राजधर यांनी समाजाप्रती जबाबदारीचे एक पाऊल पुढे टाकत ३५०० विद्यार्थ्यांना वह्या वाटपदेखील केले.
मंडळाकडून पूरग्रस्तांना तीन ट्रक भरून मदत
सांगली, कोल्हापूरला महापुराचा प्रचंड तडाखा बसल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान घडले आहे. त्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून साक्षी गणेश गणेशोत्सव मंडळाने यंदा तीन ट्रक भरून मदत तिकडे रवाना केली होती. त्याचवेळी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून घेतला.
- राजेंद्र काटे, अध्यक्ष, श्री भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्ट