शालिमारला कारने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 01:32 AM2021-11-04T01:32:38+5:302021-11-04T01:33:27+5:30
शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ एका कारने बुधवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतल्याने धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करीत कारला लागलेली आग विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
नाशिक : शालिमार येथील नेहरू उद्यानाजवळ एका कारने बुधवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतल्याने धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करीत कारला लागलेली आग विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकराेड येथील रहिवासी अनंत पडवळ (रा. नाशिकरोड) हे त्यांची आई, पत्नी, तीन मुलांसह दिवाळीनिमित्त शहरात आले होते. यावेळी ते शालिमार येथून त्यांच्या मोटारीने (एम.एच ४३ बीई २१०७) प्रवास करीत असताना सागरमल मोदी शाळेसमोर वाहतूक कोंडी झाल्याने पडवळ यांनी मोटार बाजूला घेत काही मिनिटे थांबविली असता मोटारीच्या इंजिनमधून धूर येत असल्याची बाब नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. तत्काळ त्यांनी आपल्या कुटुंबीयांना मोटारीतून बाहेर येण्यास सांगितले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी घटनास्थळ काही मिनिटात गाठले. पाण्याचा मारा करीत जवानांनी आग विझविली. आगीमध्ये मोटारीचे पुढील बाजूने काही प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची कुणालाही इजा झाली नाही. सर्व जण सुखरूप असल्याचे सूत्रांनी सांगितले.