शंभो शंकरा करूणाकरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:24 AM2020-02-22T00:24:36+5:302020-02-22T01:15:29+5:30
हर हर महादेव, बम बम भोले च्या गजरात शहर परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विवध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळपासूनच भाविकांनी महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भगवान कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली . मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.
नाशिक : हर हर महादेव, बम बम भोले च्या गजरात शहर परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विवध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळपासूनच भाविकांनी महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भगवान कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली . मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.
शहरातील कपालेश्वर, बाणेश्वर, सिद्धेश्वर, नारोशंकर, सोमेश्वरसह परिसरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान महादेवाला अभिषेक करून महापूजा करण्यात आली. अनेक मंदिरांच्या परिसरात भाविकांनी प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. मंदिर प्रशासनाबरोबरच भाविकांतर्फेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी यानिमित्ताने नवसपूर्ती केली. सायंकाळी कपालेश्वर मंदिरातर्फे भगवान महादेवाच्या मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते.
सोमेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. अनेक विक्रेत्यांनी येथे दुकाने थाटल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिवसभर भाविकांची वर्दळ सुरु असल्याने परिसरात अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम सुरु होते.
महाशिवरात्रीच्या उपवासांसाठी बाजारात कवठ, केळी, रताळी यांची मागणी वाढली होती. यामुळे या फळांच्या भावात काही अंशी भाववाढ झाली असल्याचे दिसून आले. रताळी २० रुपयांपासून ५० रुपये किलोपर्यंत विकली जात होती. रांगेतील भाविक क्षणा क्षणाला हर हर महादेव, बम बम भोलेचा गजर करीत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी विविध मंदिरांमध्ये भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी मंदिर प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. गोदाघात परिसरात कवठांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. कवठांना १० ते २० रुपये नगाप्रमाणे भाव मिळत होता. महाशिवरात्रीला कवठ या फळाला विशेष
महत्त्व असल्याने भाविकांकडून कवठांची खरेदी करण्यात आली.