साडेनऊ हजार शिक्षकांच्या चाचणीची ओढावणार नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:39 AM2020-11-25T00:39:37+5:302020-11-25T00:40:01+5:30
जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली होती. परंतु यात ठोस नियोजनाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची पुन्हा काेरोना चाचणी करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढाविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील शाळा २३ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली होती. परंतु यात ठोस नियोजनाचा अभाव असल्याने जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची पुन्हा काेरोना चाचणी करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढाविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शाळा सुरू करण्यासाठीच्या तयारीचा भाग म्हणून आरोग्य विभागाच्या मदतीने शिक्षण विभागाकडून नाशिक जिल्हा परिषद व महापालिका क्षेत्रातील तब्बल नऊ हजार ५७८ शिक्षकांचे कोरोना चाचणीसाठी नमुने संकलित करण्यात आले होते. यात रविवारी (दि.२२) सायंकाळपर्यंत महापालिका क्षेत्रात नऊ व जिल्हा परिषद क्षेत्रात ३७ असे जवळपास ४६ शिक्षक बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते, तर जवळपास तीन हजार ५५२ अहवाल प्रलंबित होते. मात्र सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन बैठकीत ४ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर प्रलंबित अहवालांकडे दुर्लक्ष झाल्याने प्रलंबित अहवालांच्या निकालाविषयी शिक्षण विभागही अनभिज्ञच असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाने दिवाळीपूर्वीच सूचना केल्या होत्या. मात्र शिक्षण विभागाने यासंदर्भात कोणतेही ठोस नियोजन नसल्याने शाळा सुरू करण्याचा दिवस जवळ आल्यानंतर शिक्षकांना त्यांच्या चाचण्या करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कोरोना चाचणी केंद्रावर अचानक शिक्षकांची गर्दी झाली. परिणामी केवळ दोन हजार ८७३ शिक्षकांचीच आरटीपीसीआर चाचणी होऊ शकली, तर तब्बल ५ हजार ३९६ शिक्षकांना अँटिजेन टेस्ट करावी लागली होती.
इन्फो-
नाशिक जिल्हा परिषद क्षेत्रातील आठ हजार २८९ व महापालिका क्षेत्रातील एक हजार ३०९ अशा एकूण नऊ हजार ५७८ शिक्षकांची चाचणी करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात शाळाच सुरू होऊ शकल्या नाही. त्यामुळे शिक्षकांच्या चाचणीचा खर्च व यंत्रणेचा वेळ वाया गेला असून, आता डिसेंबरअखेर परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु, त्यापूर्वी पुन्हा एकदा शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढावणार आहे. त्यामुळे किमान आता तरी शाळा सुरू करण्याबाबत ठोस नियोजन करूनच शिक्षकांच्या चाचण्या करण्याची मागणी मुख्याध्यापक व शिक्षकांकडून होत आहे.