शंकरनगर - टाकळी मार्गावर धोकादायक गतिरोधक

By Admin | Published: October 1, 2016 01:12 AM2016-10-01T01:12:19+5:302016-10-01T01:14:14+5:30

अपघाताच्या घटना : वाहने आदळून पडल्याने अनेकांना दुखापत

Shankarnagar - dangerous obstacles on the Takli route | शंकरनगर - टाकळी मार्गावर धोकादायक गतिरोधक

शंकरनगर - टाकळी मार्गावर धोकादायक गतिरोधक

googlenewsNext

नाशिक : द्वारका येथील शंकरनगर ते टाकळी या मार्गावर असलेल्या एका शाळेसमोरच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र सदर गतिरोधकाचे दिशादर्शक पांढरे पट्टे मारले नसल्याने दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत असल्याने चालकांचा जीव धोक्यात आला आहे. या संदर्भात पालिकेकडे तक्रार करूनही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे.
द्वारका ते टाकळी या मार्गावरील वाहतूक वाढत आहे. या मार्गावर अनेक इमारती उभ्या राहिल्या असून उपनगर, जेलरोड मार्गाला हा रस्ता जवळचा असल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने तसेच बसेस या मार्गावरून धावत असतात. वाढती वर्दळ असल्याने या मार्गावरील एका शाळेसमोर गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र त्यावर पांढरे पट्टे लावण्यात आले नसल्याने गतिरोधक दिसत नाहीत; यामुळे दुचाकी आणि चारचाके वाहने गतिरोधकावर आदळून अपघात घडत आहेत. अनेक चालकांना जीव यामुळे धोक्यात आला आहे. विशेषत: महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिक दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. शाळा प्रशासनही ही गंमत पाहत आहे.

निष्क्रिय आणि निष्काळजीपणा
वाहतुकीवर नियंत्रण मिळावे या उदात्त हेतूने रस्त्यावर गतिरोधक टाकले जातात. शाळेसमोर अशा प्रकारचे गतिरोधक असलेच पाहिजे याबद्दल कुणाचेच दुमत नाही. मात्र एकदा गतिरोधक टाकल्यानंतर त्याकडे लक्ष देण्याची काळजीही संबंधितांनी घेणे अपेक्षित आहे. मात्र शाळा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने केवळ पांढरे पट्टे नसल्यामुळे गतिरोधक धोकादायक ठरत आहेत. दररोज आठ ते दहा अपघाताच्या घटना घडत असतात. रोजच अपघात घडत असतानाही शाळेकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. शाळेच्या गेटवर असलेल्यांकडून तर गंमत पाहिली जाते. मदतीलादेखील ते धावत नसल्याची तक्रार अनेक अपघांतग्रस्त चालकांनी केली आहे. याबरोबरच प्रशासनाचादेखील यामध्ये निष्काळजीपणा असल्याचे दिसून येते. शाळेकडून तसेच परिसरातील नागरिकांनीदेखील पालिकेला याबाबत कळविले आहे. मात्र पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
 

Web Title: Shankarnagar - dangerous obstacles on the Takli route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.