कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 06:09 PM2019-11-01T18:09:41+5:302019-11-01T18:10:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली नाशिकमधील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी.
नाशिक- अवकाळी पावसामुळे शेतकाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी आपण सरकारकडे करु, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिकमधील शेतकऱ्यांना दिली.
वणी-कळवण रस्त्यावर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली, बाळू गांगोडे या शेतकऱ्याने सोयाबीनचे उद्धवस्त झालेले पीक भरल्या डोळ्याने पवार यांना दाखवताच उपस्थितांचे मन हेलावले, बाजरीच्या कणसांना फुटलेले कोंब, काळे पडलेले सोयाबीनच्या शेंगा, मनी गळून पडलेले द्राक्ष पाहून पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सवांद साधत तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांची साक्ष काढली, यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या साऱ्या व्यथा कथन करताना जिल्हा बँक, राष्ट्रीकृत बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत, उलट बँकांनी सक्तीची वसुली सुरू केल्याचे सांगून बजावलेल्या नोटिसा दाखवल्या. ज्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला व त्यांची नवे यादीत आले अशा शेतकऱ्यांना बँका नवीन कर्ज देण्यास दारा पुढे उभे करीत नसल्याचे सांगितले, तर पंचनामे करण्यासाठी आलेले तलाठी 30 टक्क्यांनी कमी नुकसान झाल्याचे पंचनामे करीत असल्याची तक्रार केली.
यावेळी पवार यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून कळवण तालुक्यातील माहिती घेतली, गेल्या दोन दिवसात पंधरा टक्के पंचनामे झाल्याचे त्यांनी सांगितले, येत्या आढवड्यात पंचनामे पूर्ण झाले की त्याचा अहवालात पाठवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली, त्यावर झालेले नुकसान खूपच आहे, आम्ही सरकारकडे ते मांडू पण तुम्हाला काय अपेक्षित आहे अशी विचारणा त्यांनी केली, त्यावर शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले सर्व नुकसान मिळावे, कर्ज माफी व्हावी अशी मागणी केली,