शरद पवार युपीएच्या नेतृत्वासाठी सक्षम नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:06+5:302021-03-21T04:15:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी युपीएचे नेतृत्व समर्थपणे केलेले असले तरी सध्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी युपीएचे नेतृत्व समर्थपणे केलेले असले तरी सध्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे राजकारणात अधिक वेळ देऊ शकत नसल्याने युपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे द्यायला हवे, असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
नाशिकमध्ये शनिवारी (दि.२०) पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणाविषयी भाष्य करताना शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व केल्यास त्याचा फायदा काँग्रेसलाही होऊ शकेल असे मत व्यक्त केले. देशात राष्ट्रीय पुरोगामी आघाडी युपीए आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून दूर असलेले काही पक्ष आहेत. असे पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात एकत्र येऊ शकतात. युपीएच्या माध्यमातून असे पक्ष एकत्र आल्यास त्याचा युपीएतील घटक पक्षांसह युपीएलाही फायदा होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इन्फो-
पश्चिम बंगालमध्ये ममतांचीच सत्ता
देशात सध्या सर्वांचेच लक्ष पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे लागले असून येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या ममता बँनर्जी यांच्याविरोधात भाजपने मोठी ताकद लावली आहे. मात्र या ठिकाणी शिवसेनेसह देशातील विविध पक्षांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत ताकद उभी केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार असल्या तरी सत्ता मात्र ममता बनर्जी यांचीच येणार असल्याचे भाकीत संजय राऊत यांनी केले.