एकलहरे वीज प्रकल्पासाठी शरद पवारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 07:08 PM2020-01-11T19:08:36+5:302020-01-11T19:09:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या सहाव्या संचाचे काम सुरू करण्यात यावे यासाठी आमदार सरोज अहिरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या सहाव्या संचाचे काम सुरू करण्यात यावे यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या निवेदनाच्या आधारे शनिवारी यासंदर्भात ऊर्जा सचिव व महापारेषणच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली. याबाबत येत्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
नाशिक औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना १९७० मध्ये झाली. तेव्हापासून या केंद्रातून वीज निर्मिती केली जात असून, २०१० मध्ये टप्पा क्रमांक एकचे आयुर्मान पूर्ण झाल्याने तो बंद करण्यात आला. त्याबदल्यात ६६० मेगावॉटचा संच मंजूर करण्यात आला. त्यासंदर्भात महानिर्मिती कंपनीच्या संचालक मंडळाने त्याला मान्यताही दिली. सध्या केंद्रात टप्पा क्रमांक २ अस्तित्वात आहे. मेरिट आॅर्डर डिस्पॅचच्या प्रणालीमुळे एक संच कायमच रिझर्व्ह शटडाउनमध्ये बंद असतो. तसेच एका संचाचा कोळसा मे. धारिवाल कंपनीला देण्यात आला आहे. त्यामुळे तीन पैकी दोन संच बंद आहेत. परिणामी सध्या फक्त एकच संच कार्यान्वित आहे. टप्पा क्रमांक दोनमधील २१० मेगावॉट क्षमतेच्या तीनही संचांची मुदत येत्या एक-दोन वर्षात संपत असल्याने ते बंद करावे लागतील. युनिट तीनची मुदत एप्रिल २०१९ मध्येच संपलेली आहे. युनिट चारची मुदत जुलै २०२० मध्ये संपेल व युनिट पाचची मुदत जानेवारी २०२१ मध्ये संपेल. त्याच्या आत येथे मंजूर असलेल्या ६६० मेगावॉटच्या संचाचे काम सुरू होणे गरजेचे असल्याची मागणी करणारे निवेदन आमदार अहिरे यांनी शरद पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिले होते. यासंदर्भात शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकलहरेच्या प्रकल्पाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी राज्याचे ऊर्जा सचिव व महावितरण, महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, सूर्यकांत पवार, निवृत्ती चाफळकर, सदाशिव अत्तरदे, संतोष जायगुडे उपस्थित होते. या बैठकीत नवीन संच कार्यरत करण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात येऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.