लोकसंग्रहातून बनलेला 'लोकनेता', ग्रामीण भागातही ED अन् 'पवार पे चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 10:36 PM2019-09-28T22:36:12+5:302019-09-28T22:46:01+5:30

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर पवार यांना भेटणाऱ्यांची रीघ लागते.

Sharad Pawar! Political Leadership Leadership!, rural people emotionally connect with sharad pawar after ED | लोकसंग्रहातून बनलेला 'लोकनेता', ग्रामीण भागातही ED अन् 'पवार पे चर्चा'

लोकसंग्रहातून बनलेला 'लोकनेता', ग्रामीण भागातही ED अन् 'पवार पे चर्चा'

Next

संजय पाठक

नाशिकशरद पवार! राजकारणातील दिग्गज नेतृत्व! मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदे भुषवलेली! जिल्ह्यावर प्रेम असलेल्या या नेत्याने नाशिककरांवर अतोनात प्रेम केले तसेच नाशिककरांनीदेखील अलोट प्रेम केलं. १९८५ मध्ये जिल्ह्यातील पंधराच्या पंधरा आमदार निवडून शरद पवार यांच्या पुलोद प्रयोगाला साथ दिली. काळ बदलला, राजकारणाची कूस बदलली तरी शरद पवार यांचे जिल्ह्याशी असलेले स्नेहसंबंध कधी दुरावले नाही. म्हणून शिखर बॅँक प्रकरणात शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यांनतर जे जे वातावरण बदलले, त्यात नाशिकमधील ग्रामीण भागात या घडामोडींचा परिणाम जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर पवार यांना भेटणाऱ्यांची रीघ लागते. त्यात तरुणांबरोबरच ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक असते. पवार साहेब आले म्हणजे आपण भेटावं आणि संवाद साधावा एवढीच माफक अपेक्षा त्यात असते. शरद पवार हेदेखील चांगदेवराव, यंदा कांदा काय म्हणतो? लासलगाव बाजार समिती काय म्हणते किंवा यावेळी द्राक्षाकडे लक्ष घालायला उशीर केला का शेतकºयांनी, असे विचारून त्यांच्याशी जवळीक साधतात. भर गर्दीत उभे असलेले श्रीराम शेटे असो अथवा येवल्याचे मारोतराव पवार असो, शरद पवार यांनी त्यांचे नाव घेऊन वास्तपुस्त केली की, ते सुद्धा भरून पावतात. जिल्ह्यातील कसबे सुकेण्याच्या ग्रामपंचायतीपासून युनोस्कोपर्यंतची सर्व ताजी माहिती असणाºया पवार यांनी जिल्ह्यातील वर्तमानस्थिती विषयी काही विषय काढून त्यांच्याकडील अद्ययावत माहिती सांगितली की, सारेच थक्क होतात. पवार यांचे नेटवर्कच इतके तगडे आहे. परवाकडे नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची मते अजमावणीसाठी आलेल्या शरद पवार यांनी बागलाण तालुक्यातील आमदाराला शिवसेनेत जाणार की येथे राहणार हे स्पष्ट सांगा आमच्याकडे दुसरे अनेक इच्छुक आहेत, असे सांगून एकेक इच्छुकांची नात्यागोत्यासहीत नावे सांगितल्याने आमदार महोदया थक्क झाल्या नसतील तर नवलच!

नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज असो किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किंवा कुसुमाग्रज प्रतिष्ठान. पवार साहेबांचा संबंध अशा शेकडो संस्थांशी कायम राहिला. नाशिक जिल्हा शेतीत प्रयोगशील असल्याने येथे शेती वाढावी, कृषी आधारित उद्योग वाढावे हा त्यांचा आग्रह. त्यावर मतमतांतरे आक्षेप जरी असले तरी पवार यांच्याबरोबर राजकारणातील अनेक जण थकलेले असताना पवार मात्र त्यांच्या तिसºया पिढीचेदेखील नेतृत्व म्हणून लढत आहेत. नाशिक जिल्हा आता कधी कॉँगेसचा, कधी राष्टÑवादीचा, तर कधी भाजप- सेनेचा जिल्हा मानला गेला असला तरी मुळात तो पवार यांचा जिल्हा म्हणूनच पुलोदच्या घटनेनंतर ओळखला गेला. शिखर बॅँक घोटाळ्याचा ठपका पवार यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या इतकाच धक्का नाशिक जिल्ह्यातील लाखो नागरिकांना बसला. पवार यांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ आणि यापूर्वी ग्रामीण भागातील पोहोचण्यासाठी असलेल्या सहकारी संस्था या सर्वांशीच संबंध! पवार यांनी सहकारी संस्था वाचविण्यासाठी वेळोवेळी धडपड केली आहे.

सार्वजनिक जीवनातील सुवर्ण महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये एका प्रकट मुलाखतीत काही वर्षांपूर्वी पवार यांनी युती सरकारच्या विरोधात आपण स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले होते आणि तेच आज ते करीत आहेत. राष्टÑवादीतील पक्षांतरे आणि सोयीने वागणाºया नेत्यांची कमी होणारी साथ यानंतरदेखील पवार हे आज खंबीरपणे लढताना, ग्रामीण भागातील जनतेला आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असे असताना पवार यांच्यावर झालेली कारवाई आणि कोणत्याही बॅँकेचे संचालक नसताना आपल्यावर कारवाई केल्याबद्दल पवार यांनी व्यक्त केलेली अनभिज्ञता यामुळे ग्रामीण भागात सहानुभूती तर आहेच परंतु यानिमित्ताने कार्यकर्तेदेखील पेटून उठले आहेत. त्याचे शक्तिप्रदर्शन लक्षात घेऊन थेट पोलीस यंत्रणेला आणि ईडीला माघार घेण्याची नामुष्की आली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले, आंदोलने होऊ दिली नाहीत. हे जरी खरे असले तरी त्याचे परिणाम या निवडणुकीत विशेषत: ग्रामीण भागात जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Web Title: Sharad Pawar! Political Leadership Leadership!, rural people emotionally connect with sharad pawar after ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.