All India Marathi Sahitya Sammelan: “स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 08:37 PM2021-12-05T20:37:24+5:302021-12-05T20:38:12+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला विरोध कोण करूच शकत नाही. यावर चर्चा होणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
नाशिक: येथे सुरू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. समारोप कार्यक्रमात निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, नाशिकचे निमंत्रक जयप्रकाश जतेगावकर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantra Veer Savarkar) योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य अजरामर आहे, असे पवारांनी स्पष्टपणे नमूद केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाबद्दल चर्चाच होऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य अजरामर आहे. वीर सावरकर हे विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाला विरोध कोण करूच शकत नाही. यावर होत असलेल्या चर्चा चुकीच्या असून, अशा चर्चा होणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी नमूद केले.
कुसुमाग्रज यांचे नाव दिले हे अगदी योग्य
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराला कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले आहे. ते अगदी योग्य आहे. अलीकडेच राज्याच्या मुख्य सचिवांना भेटलो होतो. ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत. मराठी भाषा विषयक अडचणी समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी एकत्र बसून चर्चा करायचे ठरवले आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, निवृत्ती न्या. नरेंद्र चपळगावकर बोलताना म्हणाले की, नाशिक म्हटलं की मला कवी गोविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रज आठवतात. राज्य सरकार म्हणतेय की, दहावीपर्यंत मराठी शिकण्याची सक्ती करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, ही घोषणा लवकरात लवकर अमलात आणली, तर खूप बरे होईल, अशी अपेक्षा न्या. चपळगावकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कुसुमाग्रजनगरीत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला विरोध करण्याचाही अधिकार आहे, पण व्यक्तिगत हल्ला चुकीचा आहे. त्या मतांचा विरोध करणारे दुसरेही घटक असू शकतात. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना निंदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. विशेषतः तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नावाने ज्या परिसरामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा इतक्या उत्साहाने आणि उत्तम रीतीने सुरू आहे, अशा परिसराजवळ हा प्रकार घडला. कुठेही घडणे चुकीचे आहे. पण इथे घडणे आणखी चुकीचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.