नाशकात शरद पवारच करणार तटबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:41 AM2019-09-16T01:41:38+5:302019-09-16T01:42:01+5:30
राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकमधील पक्षाचे सर्वेसर्वा छगन भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या चर्चेचा खुद्द भुजबळ यांनीच इन्कार केला असताना दुसरीकडे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता नाशिकमध्ये लक्ष घातले आहे. सोमवारी (दि.१६) पवार हे नाशिकमध्ये येणार असून, ते जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठका घेणार आहेत.
नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकमधील पक्षाचे सर्वेसर्वा छगन भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या चर्चेचा खुद्द भुजबळ यांनीच इन्कार केला असताना दुसरीकडे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता नाशिकमध्ये लक्ष घातले आहे. सोमवारी (दि.१६) पवार हे नाशिकमध्ये येणार असून, ते जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठका घेणार आहेत.
राष्टÑवादी कॉँग्रेसमधून अनेक मोठे नेते भाजप, सेनेत दाखल होत असताना राष्टÑवादीकडून आणखी कोणते नेते दुसरीकडे जाणार याविषयीची चर्चा अजूनही थांबलेली नाही. अशा अस्थिरतेच्या वातावरणात शरद पवार हे जिल्हानिहाय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असून, त्या पार्श्वभूमीवर ते सोमवारी नाशिकमध्ये पक्ष कार्यालयात दाखल होत आहेत. राज्यात राष्टÑवादीला अनेक मोठे धक्के बसले असतानाच नाशिक जिल्ह्यातून भुजबळांसह अन्य दोन आमदारांच्या पक्षांतराची चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नाशिकमध्ये लक्ष घालणे महत्त्वाचे मानले जात आहे.
मध्यंतरी सुप्रिया सुळे यांनीदेखील नाशिकमध्ये येऊन कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांची छगन भुजबळ यांच्याशी चर्चा होऊ शकली नव्हती. आता शरद पवार हेच नाशिकमध्ये येत असल्याने पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीप्रसंगी भुजबळ उपस्थित राहणार की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतदेखील शरद पवार यांनी जिल्हा पिंजून काढला होता. आता विधानसभेसाठी पवार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीत ते जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करणार असून, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिकादेखील जाणून घेणार आहेत.
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवरही लक्ष
राष्टÑवादीने जिल्ह्यातील नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांवरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांमध्ये अनेक मोठी नावे समोर आल्यानंतर निदान पक्षाचे कार्यकर्ते ठाम राहावेत म्हणून कार्यकर्त्यांशी थेट संवाद सध्या साधला जात आहे. यासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंढे, अमोल कोल्हे यांसारखे नेते कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेच्या आणाभाका देत आहेत. नाशिकमधील बैठकीतही पवार थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.