नाशिक कारखान्याचे गा-हाणे शरद पवारांच्या कानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 07:19 PM2019-12-10T19:19:28+5:302019-12-10T19:20:16+5:30
राज्यातील अनेक कारखान्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील निफाड, नाशिक साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे. नाशिक साखर कारखाना गेल्या सात वर्षांपासून बंदस्थितीत असून, या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन बाराशे मेट्रिक टन आहे. एकेकाळी भरभराट असलेल्या या कारखान्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची कुचंबना झाली असून, शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याची बाब पवार यांना पटल्यामुळे लवकरच कारखाना सुरू करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री, वित्तमंत्री व सहकारमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
राज्यातील अनेक कारखान्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील निफाड, नाशिक साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे. नाशिक साखर कारखाना गेल्या सात वर्षांपासून बंदस्थितीत असून, या कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन बाराशे मेट्रिक टन आहे. एकेकाळी भरभराट असलेल्या या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांत सतरा हजार सभासद आहेत. कारखान्याने जिल्हा बॅँकेकडून कोट्यवधींचे कर्ज घेतले असून, कारखाना बंद पडल्यामुळे बॅँकेच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे बॅँकेने कारखान्यावर जप्ती आणली असून, शेकडो कामगारही बेकार झाले आहेत ही सर्व माहिती शरद पवार यांना देण्यात आली. कारखाना पुन्हा सुरू झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल त्याचबरोबर जिल्हा बॅँकेचे कर्जफेड होऊन बॅँकेचीही आर्थिक परिस्थिती दुरुस्त होऊ शकेल. राज्य सरकारने कारखाना सुरू करण्यासाठी कर्जाची हमी घ्यावी, कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही यावेळी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. नाशिक कारखाना सुरू करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सहकारमंत्री व वित्तमंत्र्यांची संयुक्तबैठक घेण्याची ग्वाही पवार यांनी यावेळी हेमंत गोडसे, तानाजी गायधनी, दिनकर पाटील यांना दिले.