धनंजय मुंडे यांना सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 03:58 PM2019-02-20T15:58:48+5:302019-02-20T15:59:11+5:30
घोषणा : ४ मार्चला शरद पवारांच्या हस्ते वितरण
नाशिक : १७९ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार महाराष्ट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्टवादीचे नेते धनंजय मुंडे यांना घोषित करण्यात आला आहे. सोमवार दि. ४ मार्च रोजी राष्टवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी कार्यक्षम आमदार पुरस्काराची घोषणा केली. सावानाच्यावतीने माजी आमदार व पत्रकार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या १६ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. ५० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कै. लिमये यांच्या कन्या डॉ. शोभाताई नेर्लीकर व जावई विनायक नेर्लीकर यांच्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार निवड समितीचे सदस्य आमदार हेमंत टकले, महाराष्ट टाईम्सचे कार्यकारी संपादक शैलेंद्र तनपुरे, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, डॉ. नेर्लीकर दाम्पत्य यांच्या निवड समितीने मुंडे यांची पुरस्काराकरीता निवड केली. धनंजय मुंडे यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला. भाजपा विद्यार्थी आघाडी प्रमुख, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आदी पदे त्यांनी भूषविली. मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेतही ९ वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले. २०१० मध्ये त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. दरम्यान, त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्या ते महाराष्टÑ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. धनंजय मुंडे यांना विधिमंडळातील अभ्यासू वक्ता म्हणून २०१७ मध्ये लोकमतच्यावतीनेही पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय, २०१८ चा लोकमततर्फेच दिला जाणारा पॉवरफूल राजकारणी म्हणूनही पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
पुरस्काराने सन्मानित
गेल्या सोळा वर्षांत आमदार बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर,शोभाताई फडणवीस, जीवा पांडू गावीत, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, पांडुरंग फुंडकर, जयंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू, डॉ. निलम गो-हे आणि गिरीश महाजन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.