नव्या सहकारी संस्थांना भागभांडवलांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:36 AM2018-11-20T00:36:35+5:302018-11-20T00:36:49+5:30
सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था संकल्पना पुढे आणली असून, या माध्यमातून नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या सहकारी संस्थांना किमान ५० लाख रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.
नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था संकल्पना पुढे आणली असून, या माध्यमातून नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या सहकारी संस्थांना किमान ५० लाख रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. जेणेकरून महिलांना रोजगार निर्मितीसाठी वाव मिळेल, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कल्याणी महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने आयोजित ‘श्रीमती कल्याणी’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी चरेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा महिला बँकेच्या अध्यक्ष शशीताई अहिरे, ‘भ्रमर’चे संपादक चंदुलाल शहा, डॉ. शरद महाले, गोपाळ पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी चरेगावकर म्हणाले, की महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यवसायासाठी धाडस महिलांनी करणे गरजेचे आहे. व्यवसाय करण्यापूर्वी त्यामागील उद्देश, अर्थकारण, उत्पादन प्रक्रिया, आदि बाबींचा सखोल अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला.
दरम्यान, मेळघाटमधील ‘संपूर्ण बांबू केंद्रा’च्या प्रमुख निरुपमा देशपांडे यांना ‘श्रीमती कल्याणी’हा द्वैवार्षिक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप होते. यावेळी काही उत्कृष्ट महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अंजली पाटील यांनी केले. कल्पना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
बांबू उद्योगाने अर्थकारण बळकट
बांबू उद्योगामुळे मेळघाटला सकारात्मक ओळख मिळाली. सरकारी नोकरी वर पाणी सोडून मेळघाट गाठले. धारणी, चिखलदरा या भागात कामाला निरुपमा देशपांडे यांनी सुरुवात केले. तेथील लोकजीवन व त्यांची जगणे जवळून अनुभवत असताना त्यांच्यामधील कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यातूनच पुढे बचत गटांची स्थापना झाली आणि बांबू लागवडीला प्रचार-प्रसार केला. बांबूपासून वर्षभर उत्पादन मिळत असल्यामुळे हा व्यवसाय येथील रहिवाशांनी घरोघरी सुरू केला. परिणामी मेळघाटचे अर्थकारण बळकट होण्यास मदत झाल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.