धारदार हत्यारांसह पुण्याचे चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:54 AM2019-06-17T00:54:47+5:302019-06-17T00:55:08+5:30

पुणे येथील चौघा संशयित युवकांना कुकरी, लांब चाकू अशा घातक धारदार हत्यारांसह सरकारवाडा गुन्हे शोध पथकाने सीबीएस येथील एका लॉजवर छापा मारून ताब्यात घेतले. हे चौघे शहरात शस्त्रांसह कोणत्या उद्देशाने दाखल झाले याबाबत अद्याप पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात आली नसून त्यांचा कसून तपास सुरू आहे.

 With the sharp weapons, all four of Pune are in control | धारदार हत्यारांसह पुण्याचे चौघे ताब्यात

धारदार हत्यारांसह पुण्याचे चौघे ताब्यात

Next

नाशिक : पुणे येथील चौघा संशयित युवकांना कुकरी, लांब चाकू अशा घातक धारदार हत्यारांसह सरकारवाडा गुन्हे शोध पथकाने सीबीएस येथील एका लॉजवर छापा मारून ताब्यात घेतले. हे चौघे शहरात शस्त्रांसह कोणत्या उद्देशाने दाखल झाले याबाबत अद्याप पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात आली नसून त्यांचा कसून तपास सुरू आहे.
याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित निखिल उमाकांत तावरे (२२, रा. शास्त्रीनगर), शुभम संदीप उत्तेकर (१८, रा. गांधीनगर), अक्षय गणेश लोले (२२, रा. शिवाजीनगर), दत्ता नारायण गिरे (२५, रा. टिंगरेनगर) हे चौघे गुन्हे शोध पथकाच्या हाती अचानकपणे राबविण्यात आलेल्या कोम्बिंग, आॅल आउट आॅपरेशनदरम्यान हाती लागले. शनिवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास अचानक पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत मोहीम राबविली. शुक्रवारी दरोड्याचा प्रयत्न करत मुथूट फायनान्सच्या कार्यालयात हल्लेखोरांनी केलेल्या बेछुट गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर शहर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शहरासह विविध जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आॅल आउट मोहिमेत सर्व हॉटेल्स, लॉज तपासणीचे आदेश दिले होते. यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांच्यासह गुन्हे शोध पथकाने सीबीएसच्या जवळील हॉटेल पद्मामध्ये तपासणी केली. यावेळी हॉटेलच्या २०९ क्रमांकाच्या खोलीत हे चौघे संशयित वास्तव्यास असल्याचे आढळून आले.
यावेळी त्यांची विचारपूस केली असता चौघांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची झडती घेण्यास सुरुवात केली. यावेळी बॅगेत कुकरी, मोठा चाकू अशी घातक शस्त्रे मिळून आल्याने पोलिसांनी तत्काळ त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्यटनासाठी नाशकात मुक्काम
चौघा संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी नाशिकमध्ये पर्यटनासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. पुण्यात कोणाशी तरी भांडण झाल्यानंतर हे चौघे संशयित युवक नाशिक फिरण्यासाठी आल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यांची पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांकडेही चौकशी करण्यात आली असता त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी सांगितले.

Web Title:  With the sharp weapons, all four of Pune are in control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.