नाशिकमध्ये २ लाख लोकांच्या दारी पोहचले ‘शासन’; जिल्ह्यात आतापर्यंत ६२ शिबिरांद्वारे लाभ
By अझहर शेख | Published: June 16, 2023 03:33 PM2023-06-16T15:33:03+5:302023-06-16T15:33:13+5:30
शासकीय स्तरावरील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व शंकांचे निरसन या अभियानातून करण्यात आले.
नाशिक : लोककल्याणार्थ समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २ लाख १८ हजार ४४० लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये दर गुरुवारी तालुकानिहाय शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांतर्गत विविध शासकीय खात्यांकडून लाभार्थींना लाभ दिला गेला. एकूण ६२ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, असा दावा प्रशासनाने केला आहे.
राज्य शासनाच्या आदेशान्वये मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. गुरुवारी (दि. १५) या अभियानाचा समारोप करण्यात आला. अभियानांतर्गत महसूल विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, कृषी, समाजकल्याण, महिला व बाल विकास, पशुसंवर्धन, मानव विकास, कामगार विभाग, कौशल्य विकास, सहकार आदी विभागांकडून त्यांच्या खात्यातील विविध योजनांतर्गत पात्र लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे.
शासकीय स्तरावरील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व शंकांचे निरसन या अभियानातून करण्यात आले.
जिल्ह्यात महसूल विभागाच्या तहसील कार्यालयांकडून ३० हजारांपर्यंत लाभार्थींना विविध योजना व दाखले, प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाच्या क्षयरोग डीबीटी याेजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन आदी योजनांमधून लाभ देण्यात आला. सर्वाधिक कळवण तालुक्यात ८१ हजार ३८ तर मालेगावात ३५ हजार ३९६ लाभार्थींना लाभ देण्यात आला.
तालुकानिहाय लाभार्थी असे...
नाशिक - १२२८१
निफाड- १४२४०
सिन्नर- ०६४०२
मालेगाव- ३५३९६
कळवण- ८१०३८
सुरगाणा- ५८०७
दिंडोरी- २१८९७
पेठ- २२८२
येवला- ११४८३
नांदगाव- ४०८५
चांदवड- ६४४४
देवळा- २७८५
बागलाण- ७९८२
इगतपुरी- २३९१
त्र्यंबकेश्वर- ३९२७
एकूण २,१८,४४०