नृत्याविष्काराच्या बरसल्या श्रावण सरी
By admin | Published: August 6, 2016 01:17 AM2016-08-06T01:17:28+5:302016-08-06T01:17:38+5:30
गुरुपूजन : ‘कलानंदचा’ सोहळा रंगला
नाशिक : ‘पाऊस आला... पाऊस आला’, ‘घनन घनन घन’आदि श्रावणगीतांसह ताल तीन तालवर विविध कथक नृत्याविष्कारातून बरसलेल्या श्रावण सरींनी शुक्रवारी कलानंदचा गुरुपूजन सोहळा रंगला.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे कलानंद कथकच्या गुरुपूजन सोहळ्यात विद्यार्थिनींनी गुरू संजीवनी कुलकर्णी यांना विविध नृत्यांविष्कारांच्या माध्यमातून नृत्यांजली अर्पण केली. याप्रसंगी नगरसेवक अश्विनी बोरस्ते यांच्यासह कलानंदचे पालक व गुरुजन उपस्थित होते. कथकच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी पाऊस आला...पाऊस आला, तीन ताल, वाऱ्याची गोष्ट, प्रणम्य, घनन घनन घन आदि नृत्यांमधून नृत्यकलेचे विविध प्रकार सादर केले. दिव्यांग विद्यार्थिनीच्या नृत्यकौशल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सरस्वती स्तुती, ट्रायो (तीन विद्यार्थी, विद्यार्थिनींचा समन्वय), आयी बरखा, झपताल, बरसे बदरिया, बरखा ऋतू आयी, तराणा आदि नृत्याविष्कारांना रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. विविध नृत्याविष्कारांनी रंगलेल्या नृत्य मैफलीची सांगता ‘ड्रॉप आॅफ द ऱ्हिदम’ नृत्याविष्काराने झाली. (प्रतिनिधी)